समाज माध्यमांवर ध्वनीफीत प्रसारित झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ

नागपूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असे आक्षेपार्ह विधान केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांची जीभ घसरली. ते म्हणाले, ‘‘मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही.’’ त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे. भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असे विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र पटोले यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पटोले हे भाषण देत नव्हते तर ते लोकांच्या गराडय़ात होते. लोक तक्रारी करीत होते. भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे. त्याच्यासंदर्भात ते बोलले. शिव्या देणे, मारणे, संपवणे हे काँग्रेसची संस्कृती नाही. ती भाजपची संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भाजपने ‘चोर’ म्हटले होते. काल चंद्रकांत पाटील हे संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.