भंडारा : भंडारा आज कारधा यांना जोडण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी कारधा येथे वैनगंगा नदीवर मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र सध्या या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याचा विसर्ग होण्याचे मार्ग बंद झाले आहेत त्यामुळे पुलावर एक फुटापर्यंत पाणी साचले आहे.

भंडारा बायपास मार्गाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण करण्यात आल्याने भंडारा शहरातून होणारी जड वाहतूक कमी झाली असली तरी जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या पुलावरुन  वाहनांची वर्दळ कायम आहे. मागील तीन वर्षांपासून या पुलाची डागडुजी झाली नसल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता याच खड्यांमध्ये सुमारे एक फुट पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तीनच दिवसांपूर्वी माजी खा. सुनील मेंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पुलावरुन पाणी वाहून जाण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि खड्डयांची डागडुजी करावी, अशी सूचना केली होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. परिणामी, या पुलावर अपघाताचा धोका कायम आहे.

दरम्यान, दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वत्र पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून सोमवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसला.

नेहमीप्रमाणे भंडारा शहरातील सखल भागात नेहमीच पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. शहरात भूयारी गटारीच्या कामामुळे खोदलेले रस्ते चिखलमय झाले असून रहदारीसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर अपघाताचा धोका वाढला आहे. पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.

गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढला

संततधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. गोसेखुर्द धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला जात आहे. सध्या या धरणातून १२०० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून गरजेनुसार ६ हजार क्युमेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. सध्या गोसेखुर्द धरणाच्या ९ वक्रद्वारातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय धापेवाडा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून ३ हजार ५३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारा शहराजवळच्या कारधा येथील वै नदीची धोक्याची पातळी २४५.५० मीटर असून सध्याची पातळी २४२.२९ मीटर आहे.

तीन मार्ग बंद

रविवारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार असून काही मार्गावर पाणी आल्याने ते मार्ग बंद करण्यात आले आहे. भंडारा ते कारधा नदीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी ते टेमनी आणि चुल्हाड ते सुकळी नकुल दोन मार्गावर पाणी आल्याने हे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

पहिल्याच पावसात अनेक रस्ते उखडले

नगरपरिषद अंतर्गत एक महिन्या आधी नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केलेले रस्ते  काम पहिल्याच पावसात उखडले असून रस्त्यावर तळे साचले आहे. शास्त्री चौक ते टाकळी पर्यंत रस्त्याचे अधुरे काम, शास्त्री चौक ते मेंढा, आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून पाणी साचले आहे. सामान्य रुग्णालय ते महात्मा फुले मार्केट, अशोका हॉटेल मेन रोड या मार्गावरही रस्त्यांवर पाणी सचिन वाहतूक विस्कळीत झाली आहे, नागपूर नाका ते राजीव गांधी चौक रस्त्याचे अधुरे काम असून अजूनही इलेक्ट्रिक पोल काढले गेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हनुमान नगर तकिया वार्ड ते म्हाडा कॉलोनी खात रोड भंडारा पर्यंत रस्त्याला खड्डे खड्डे रुख्मिणी नगर खात रोड भंडारा येथे अजूनही नगर परिषद अंतर्गत रस्ता तयार केला नाही. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी नगर पालिका अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना ताबडतोब रस्त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या. त्या कामाची चौकशी करा असेही सांगितले.