अकोला : आकडे टाकून वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने अकोला परिमंडळात वीज वाहिनीवरील अनधिकृत आकडे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. चार दिवसात परिमंडळातील ३६४ आकडे बहाद्दरांवर कारवाई केल्यामुळे दोन हजाराहून अधिक हॉर्स पॉवरचा भार कमी झाला आहे. त्यामुळे अकस्मात रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

हेही वाचा >>> प्रवेश पंचतारांकित, आत कोंडवाडा! गडचिरोली जिल्हा रुग्णालय अस्वच्छता आणि गैरसोयीमुळे आजारी

अधिकृत वीज जोडणी असणाऱ्या शेतकऱ्यांना आठ तास वीज पुरवठा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. मात्र, अवैध वीज जोडणीचा वापर वाढल्याने रोहित्रे अतिभारीत होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी रोहित्रे अतिरिक्त भारामुळे जळाली आहेत. वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनधिकृत वीज वापरामुळे महावितरण यंत्रणेवर ताण वाढत असल्याने मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी आकडे टाकणाऱ्याविरोधात धडक मोहीम राबविण्याचे क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिले. त्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, सुरेंद्र कटके आणि जीवन चव्हाण यांच्या पुढाकाराने परिमंडळात मोहीम सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नागपूरची प्रसिद्ध काळी मारबत, काय आहे इतिहास? जाणून घ्या

परिमंडळातील सर्वच विभागात मागील चार दिवसात केलेल्या कारवाईत ३६४ अनधिकृत वीज वापराचे आकडे काढण्यात आले आहेत. यामध्ये अकोला ५३, वाशीम १६७ आणि बुलढाणा जिल्ह्यातील १४४ आकड्यांचा समावेश आहे. परिमंडळात कृषी वाहिनीवर ३६४ ठिकाणी आकडे टाकून दोन हजार ३८ हॉर्स पॉवर विजेचा अनधिकृत वापर करण्यात येत होता. महावितरणच्या कारवाईमुळे वीज चोरीचा अतिरिक्त भार कमी झाल्याने आकस्मिकपणे वाढलेले रोहित्र जळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या प्रकरणात फौजदारी कारवाई होणार महावितरणला माहिती न देता मंगरूळपीर तालुक्यात नऊ ठिकाणी गावठाण वीज वाहिनीवरून परस्पर कृषी वाहिनीला वीज पुरवठा करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे शेतकऱ्यांसह महावितरण कर्मचाऱ्यांसाठी धोक्याचे आहे. शिवाय हे कृत्य कायदेशीर गुन्हा असल्याने महावितरणकडून याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.