नागपूर: राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे स्वप्न बघतात. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्याच्या महत्त्वाच्या पदावर आपले नियुक्ती व्हावी यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतात. स्पर्धेच्या युगामध्ये एमपीएससीसारख्या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होणे साधी गोष्ट नाही. त्यामुळे एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि त्यांचे सहकारी, नातेवाईक हे मिरवणूक काढून, गुलाल उधळून आनंद साजरा करताना दिसतात.
नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अकोला येथील प्रगती जगताप अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये राज्यातून पहिली आली आहे. सध्या प्रगती जगताप या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यामध्ये गटविकास अधिकारी पदावर आहेत. राज्यसेवा परीक्षेत पहिल्या आल्यानंतर त्यांची नियुक्ती पुन्हा मोठ्या पदावर होणार आहे.
परीक्षेच्या निकालानंतर त्या पहिल्यांदाच अकोला या आपल्या मुळ गावी गेल्या असून यावेळी त्यांची भव्य अशी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा व्हीडीओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.
राज्यसेवेची पूर्व परीक्षा असताना, वडिलांचे अचानक निधन झाले. वडिलांच्या मृत्यूने प्रगतीच्या मनावर परिणाम झाला. ती नैराश्यात गेली. त्यात प्रकृती अस्वस्थ्यतेने तिला ग्रासलेले अशा परिस्थितीतून बाहेर पडत आपल्या लक्ष्यावर केंद्रीत करून प्रगती जगताप यांनी राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
सुनील जगताप असे प्रगतीच्या वडीलांचे नाव. अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडीमधून नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. मात्र, ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे प्रगती नैराश्यात गेली. डिसेंबरमध्ये पूर्व परीक्षा असताना, त्याचा अभ्यासात तिचे मन लागत नव्हते. मात्र, मित्र-मैत्रिणी आणि घरच्यांच्या मदतीने त्यातून बाहेर पडून प्रगतीने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. सुरुवातीपासून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तिने तयारी सुरू केली.
घरी मोठा भाऊ एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेत काम करतो. मात्र, आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगातून प्रशासकीय सेवा करण्याची इच्छा मनोमन ठेवत २०१८ ते २०२२ या दरम्यान ती कृषीसेवक म्हणून कार्यरत होती. ते पद सोडून तिने राज्यसेवेची तयारी सुरू केली. त्यातून तिची २०२३ मध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून निवड झाली होती. मात्र, ती कळमेश्वर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाल्या. याच दरम्यान त्यांच्या प्रकृतीत झालेला बिघाड, त्यातून आयसीयूत तिच्यावर काही महिने उपचारही सुरू होते. मात्र, आपल्या ध्येयाने पछाडलेल्या प्रगतीने अखेर राज्यसेवेत कमाल केली. आता तिला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती मिळणार आहे.
