नागपूर: शेतमालाला हमी भाव देऊ, कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू, अशी भूल पाजणारे सरकार लबाड आहे. राज्यातील शेतकरी हवालदील असताना कृषीमंत्री विधीमंडळात रमी खेळत असतील तर ही शेतकऱ्यांची जाहिर थट्टा आहे, असा आक्रोश करीत रस्त्यावर उतलेल्या प्रहार संघटनेने गुरुवारी सकाळी ऑटोमोटिव्ह चौकात चोहोबाजूंनी वाहतूक अडवून धरली.
शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेले आमदार बच्चू कडू यांनी गुरुवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार ऑटोमोटिव्ह चौकात गुरुवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शक्ती एकवटली.शेतीमालाला योग्य हमी भाव द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, दिव्यांग बांधवांना दरमहा ६ हजार रुपये निर्वाह भत्ता द्या, मेंढपाळ- मच्छिमारांसह दुग्दव्यावसायिकांनाही आर्थिक मदत द्या, हातमजुरांना सन्मानाने जगण्यासाठी हाताला काम उपलब्ध करून द्या या व अशा १७ मागण्यांवरून प्रहारने राज्यभरात चक्काजामचा इशारा दिला होता. प्रहारचे कार्यकर्ते सकाळी १० वाजता ऑटोमोटिव्ह चौकात दाखल झाले. चारही बाजूंनी वाहनांचा मार्ग अडवून धरला. त्यामुळे पोलिसांनी लगेच ऑटोमोटिव्ह चौक गाठत २७ जणांवर वाहतूक व्यवस्था विस्कळित केल्या प्रकरणात गुन्हे दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले.
शेतमालाला २० टक्के बोनस देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. तेही सरकारने पाळले नाही. उलट राज्यातील शेतकरी हवालदील असताना कृषी मंत्री सभागृहात रमी खेळत बसतात, हे गंभीरच नसून शेतकऱ्यांची थट्टा करण्यासारखे आहे, असा आक्रोश प्रहारच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.प्रहारचे शहर अध्यक्ष अमोल इसपांडे, पूर्व नागपूर अध्यक्ष सागर लाडेकर पश्चिम नागपूर अध्यक्ष कविश्वर राऊत, उत्तर नागपूर अध्यक्ष श्याम रहांगडाले, दिव्यांग शहर प्रमुख धरम पडवार, मध्य नागपूर अध्यक्ष जितू लोढे, दक्षिण पश्चिम अध्यक्ष राजेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सकाळी कामाच्या वेळी दोन तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. ऑटोमोटिव्ह चौकाचा परिसर मोठ्या प्रमाणात हातमजूर असलेल्यांचा भाग आहे. शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांवर लागणारा मजूरवर्ग या भागातून जातो. त्यामुळे रोजच्या प्रमाणे कामावर निघालेल्या मजुरांची प्रहारच्या आंदोलनामुळे दमछाक झाली.
अमरावती मार्गावर कार्यकर्त्यांना रोखले
आमदार बच्चू कडू यांचा मतदार संघ असलेला अमरावती जिल्हा हा प्रहार संघटनेचे मुख्यालय आहे. त्यामुळे राज्यभरात पुकारलेल्या या चक्काजामसाठी प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नागपूरच्या दिशेने निघाले होते. याची कुणकूण लागताच पोलिसांनी नागपूर अमरावती महामार्गावरील गोंडखैरी येथे कार्यकरर्त्यांची कोंडी करीत त्यांना शहरात प्रवेश करण्यावरून रोखून धरले.