नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आज ( सोमवारी) मनुस्मृती दहन दिनानिमित्त वंचित बहुजन विकास आघाडीने स्री मुक्ती परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. तीनच दिवसाने नागपुरात कॉंग्रेसची जाहीर सभा आहे. भाजपने अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने वातावरण निर्मिती सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर आंबेडकर   स्री मुक्ती परिषदेत  काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२० मार्च १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्यावर पाणी सत्याग्रह करून मानव मुक्तीच्या लढ्यास सुरूवात केली होती. याच वर्षी म्हणजे २५ डिसेंबर १९२७ ला महिला, शुद्ध,अतिशुद्र यांच्या गुलामीची कायदे संहिता असलेल्या मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले होते. यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला होता. हा दिवस स्री मुक्ती दिन म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे पाळला जातो. यानिमित्ताने सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानावर दुपारी  २ वाजता स्री मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली आहे.  नागपूर हे जसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तसेच ते दीक्षाभूमीमुळे सामाजिक समरसतेची भूमी म्हणून देशभर ओळखले जाते. त्यामुळे परिषदेतून प्रकाश आंबेडकर काय संदेश देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>सिलेंडरचा स्फोट,५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सध्या देशात धार्मिक उन्मादाचे वातावरण आहे. भाजपची धोरणे ही याला पूरक ठरणारी आहेत. संविधानाचा सोयीनुसार वापर केला जात असल्याने संविधान प्रेमींमध्ये नाराजी आहे. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण भाजप विरोधी असले तरी त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे भाजपलाच होत असल्याचे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे. दुसरीकडे आंबेडकर यांचा कॉंग्रेस विरोध सर्वश्रुत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत आंबेडकर यांचा समावेश करण्यास कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध आहे. भाजपला शह देण्यासाठीच कॉंग्रेसने पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूर मध्ये जाहीर सभा आयोजित केली आहे. त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर याची सभा होत असल्याने ते कॉंग्रेसबाबत काय भूमिका मांडतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे