नागपूर : आम्ही घराणेशाहीला वाचवण्यासाठी महाविकास आघाडीत सामील होणार नाही तर मुद्याच्या आधारावर सामील होऊ, असे सांगून
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे.

रामटेक येथे जाहीर सभेला जाण्यापूर्वी ॲड. आंबेडकर यांनी शुक्रवारी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले. शिवाय त्यांनी आपण घराणेशाहीला वाचवण्यासाठी आघाडीत जाणार नाही. तर आम्ही काही मुद्यांच्या आधारावर आघाडी करण्यास तयार आहोत. आम्हाला लोकशाहीचे सामाजिकीकरण करायचे आहे. महाविकास आघाडीने किमान तीन तरी जागेवर अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, असा आमचा आग्रह राहणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा – दस्तलेखकाच्या मानेवर चाकूने हल्ला, भर तहसील कार्यालय परिसरातच…

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत आंबेडकर म्हणाले, काँग्रेस आणि शिवसेनेत भांडणं सुरू आहेत. आम्ही तर उपरे आहोत. त्यांची भांडणे संपल्यानंतर आमच्याशी चर्चा करतील. आम्ही मात्र, राज्यातील ४८ पैकी ४६ जागांवर लढण्याची तयारी करीत आहोत. या सर्व मतदारसंघात आम्हाला किमान अडीच लाख मते मिळू शकतील एवढी ताकद आमची आहे. आम्ही आघाडीकडे २८ जागांचा प्रस्ताव दिला आहे. स्वत: अकोला येथून मी लोकसभा लढणार आहे. समजा आघाडी होऊ शकली नाही तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू आणि किमान सहा जागांवर विजय मिळवू, असा विश्वासही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – बिल गेट्सची भारतात टपरीवर चहा पिण्याची ‘इनसाईड स्टोरी’, नागपूरच्या डॉलीने आधी दिला होता नकार…

.. तर नागपूर जिंकणे शक्य

नागपूर लोकसभा जागेबाबत ते म्हणाले, ही जागा निवडणुकीसाठी सर्वात सोपी आहे. महाविकास आघाडीने या जागेसाठी योग्य नियोजन केल्यास विजय प्राप्त करता येणे शक्य आहे. भाजपा एकीकडे “४०० पार”ची घोषणा देते आणि इतर पक्षांची फोडाफोडी आणि त्यांचे नेते खरेदी करते. वास्तविक भाजपाला एवढा आकडा प्राप्त होणार नाही याची भिती आहे. त्यामुळे ते इतर पक्षांतील नेत्यांना विकत घेत आहेत. पण, या नेत्यांसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भाजपाविरुद्ध रोष आहे. भाजपाला पराभूत करू शकणाऱ्या उमेदवाराला हे कार्यकर्ते मतदान करणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.