नागपूर : आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पक्षाने एकत्रित निवडणूक लढावी यासाठी मायावती – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांकडून प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चांगली मते मिळवली होती. मात्र, बसपची मतांची टक्केवारी घटली होती. हे दोन्ही पक्ष रिंगणात असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जबर फटका बसला. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून तर आगामी सर्व निवडणुकांमध्ये बसप व वंचित आघाडीने एकत्रित निवडणुका लढवाव्यात यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कळते. वंचित बहुजन आघाडीने २०१९ च्या निवडणुकांमध्ये बहुतांश सर्व ठिकाणी उमेदवार दिले.  बसपने देखील बहुतांश सर्व जागांवर उमेदवार दिले होते. परंतु, वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांच्या मतांची टक्केवारी घटली होती. विशेषत: विदर्भात मोठा फटका बसपला बसला होता. या दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी बघता हे पक्ष एकत्र आल्यास मतांमध्ये भर पडेल.

आघाडीची आवश्यकताच नाही – आंबेडकर

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, बसप हे महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ बुजगावणे म्हणून उरले असून त्यांच्यासोबत आघाडी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही शिवसेनेशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवसेनेला ते नको आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. केवळ स्थानिक लहानसहान संघटना, पक्ष यांना सोबत घेऊन निवडणूक लढवू, असेही आंबेडकर  म्हणाले.

निर्णय मायावती घेतील – ताजणे

याबाबत बसपचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे म्हणाले, आघाडीचा निर्णय पक्ष प्रमुख मायावती घेतील. स्थानिक पातळीवरील ही गोष्ट नाही. आपल्याकडे तसा प्रस्ताव देखील आला नाही. वंचित बहुजन आघाडीकडून आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचे आपण ऐकले आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar move for alliance with mayawati zws
First published on: 13-09-2022 at 01:51 IST