नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलून इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्याविरुद्ध दाखल गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केला आहे. मात्र, कोरटकरने शिवरायांसमोर नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करुन मोबाईल आणि सीमकार्ड सायबर पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी जात असल्याचे सांगून तपासात पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोरटकरविरुद्ध शिवप्रेमींमध्ये खदखद अद्याप कायम आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी नुकतेच छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये “जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ नागपूर पोलिसांनीही तक्रारीरवरुन कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो गुन्हा कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आता कोल्हापूर पोलीसच करणार असल्याची प्रतिक्रिया प्रभारी ठाणेदार रुपाली बावणकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने या गुन्ह्यात कोरटकरला दिलासा देत ११ मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले.

का पळून गेला कोरटकर?

प्रशांत कोरटकरने गुन्हा दाखल होताच, तो आवाज माझा नसून मॉर्फ केला आहे. असा दावा केला होता. त्यानंतर त्याने शहरातून पलायन केले होते. त्यावरुन कोरटकर खोटारडा असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांच्या तपासात सीडीआर आणि लोकेशनवरुन कोरटकरनेच इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फरार कोरटकरचा व्हिडिओ व्हायरल

फरार असलेल्या प्रशांत कोरटकर याचा व्हिडिओ रविवारी रात्री व्हायरल झाला. त्याने या प्रकरणाबाबत कुठलीही माफी मागितली नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतीसुमने उधळली. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे महाराष्ट्राला जगभरात ओळखले जाते. त्यांच्या कथा ऐकून लहानाचे मोठे झालो आहे. त्यांच्या कथा अजूनही प्रेरणा देतात. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडला अनेकदात अनेकदा भेट दिली व नतमस्तक झालो. त्यांना मी मानाचा मुजरा करतो, असे कोरटकरने व्हिडिओत म्हटले आहे. दरम्यान, कोरटकरचा व्हिडिओ हा एखाद्या कार्यालयातील दिसून येत आहे. तो व्हिडिओ काही पत्रकारांपर्यंत पोहोचविण्यात आला. आता पोलीस व्हिडिओ कुठून व्हायरल झाला ? याची चौकशी किती वेगाने करतात हा प्रश्न उपस्थित होत आहे.