गडचिरोली : गावापर्यंत चारचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने गरोदर मातेला रुग्णवाहिकेपर्यंत गावकरी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने खाटेची कावड करून न्यावे लागले. अतिदुर्गम एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गावात घडलेल्या घटनेने शासनाच्या विकासाच्या दाव्यांना पुन्हा एकदा फोल ठरवले आहे.

रुनिता दुम्मा (२०), असे गरोदर मातेचे नाव आहे. ती रेकनार (कसनसुर) येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी गोटाटोला येथे आली होती. मात्र, मंगळवारी सकाळी तिची प्रकृती अचानक खालावल्याने गावकऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधला. गोटाटोला येथील आशा सेविकेने तत्काळ जारावंडी प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवले. माहिती मिळताच समुदाय आरोग्य अधिकारी गजानन शिंदे यांनी वैद्यकीय चमूसह रुग्णवाहिका रवाना केली. परंतु गोटाटोला गावाकडे जाणारा एक किलोमीटरचा रस्ता खराब असल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही.

अशा कठीण परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पायदळ गावात पोहोचून प्राथमिक उपचार केले व गरोदर मातेला खाटेची कावड करून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत आणले. त्यानंतर तीला जारावंडी आरोग्य केंद्रात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गरोदर मातेची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोहखनिज प्रकल्पातून हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील अनेक गावतील नागरिकांना रस्त्याअभावी दररोज अशा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाविरोधात गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

 ‘आधी रस्ता, मग मत

गोटाटोला ग्रामस्थांनी रस्त्यासाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरच रस्ता बांधण्याचे आश्वासन दिले होते. तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याने गावाकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे समोर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रस्ता दुरुस्त न केल्यास मत देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

आरोग्य विभागाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ गोटाटोला गावाकडे धाव घेतली. गरोदर मातेवर प्राथमिक उपचार करून रुग्णवाहिकेपर्यंत पायी खाटेवर पोहोचवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी महिला गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गरोदर मातेची प्रकृती आता स्थिर आहे. –डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली.