अमरावती: विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबादेवीचा यंदाचा आश्विन नवरात्रोत्सव सोमवार, २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. यानिमित्त श्री अंबादेवी संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सोमवारी पहाटे ४.३० वाजता वेद मंत्रोच्चारात घटस्थापना आणि अभिषेक विधीने उत्सवाला सुरुवात होईल. सकाळी ८ वाजता ध्वजारोहण केले जाईल. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत तपोवनवासी बंधू-भगिनी दर्शनासाठी येणार असल्याने त्या काळात सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेता येणार नाही. शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी ललिता पंचमीनिमित्त देवीची विशेष पूजा केली जाईल.
१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० पासून नवचंडी यागाला सुरुवात होईल आणि सायंकाळी ७ च्या सुमारास पूर्णाहुती होईल. तसेच, २ ऑक्टोबर रोजी दरवर्षीप्रमाणे श्री अंबादेवी आणि एकवीरा देवीची संयुक्त पालखी सीमोल्लंघनासाठी निघेल.
नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर सकाळी ५ वाजता उघडणार असून रात्री १२ वाजता बंद होईल. भाविकांच्या सोयीसाठी पूर्वेकडील प्रवेशद्वारातून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ओटी भरण्याचीही वेगळी सोय असेल. मंदिराच्या दक्षिणद्वारातून एकवीरा देवीकडे जाण्याचा मार्ग आहे, तर उत्तरद्वारातून वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष प्रवेश व्यवस्था असेल.
या काळात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात श्री अंबादेवी हॉस्पिटलतर्फे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आणि पोलीस चौकीही उभारण्यात येणार आहे. इच्छुक भाविकांसाठी सकाळी १० ते १२ या वेळेत ३० रुपये शुल्क भरून भोजन प्रसाद उपलब्ध असेल, मात्र ही व्यवस्था मर्यादित संख्येसाठी आहे. २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत संस्थानच्या कीर्तन सभागृहात संत सचिन देव महाराज यांचे ‘गुरुचरित्र महात्म्य’ या विषयावर प्रवचनमाला होईल. याशिवाय रोज विविध भजन मंडळी भजने सादर करतील, अशी माहिती श्री अंबादेवी संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे.
संस्थानने सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.अमरावतीचे श्री अंबादेवीचे मंदिर प्राचीन आहे. अंबादेवीची मूर्ती वालुकामय पाषणाची असून पद्मासनात स्थित आहे. सुमारे पंधराशे वर्षांपुर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी, असे संदर्भ आढळतात. रक्मिनी हरणाशीही या मंदिराचा संदर्भ जोडण्यात येतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका श्री अंबादेवीला आली होती, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.