नागपूर : भारतातून सात दशकांपूर्वी चित्ता पूर्णपणे नामशेष झाला, पण वर्षभरापूर्वी चित्ता प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १७ सप्टेंबर २०२२ ला नामिबियाहून भारतात आठ चित्ते आणले. त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ ला दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले. मात्र, नऊ चित्त्यांच्या मृत्यूनंतर या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे केले जात असतानाच आता चित्ता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी केली जात आहे.

चित्त्याच्या लागोपाठ होणाऱ्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून काही चित्ते इतरत्र स्थलांतरित करण्याचे आणि विशेष करून राजस्थानमधील मुकुंद्रा अभयारण्याचा गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने या निर्देशांकडे दुर्लक्ष केले. याउलट कुनोतील अधिकाऱ्यांना अभ्यासासाठी दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एवढेच नाही तर चित्त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. ‘रेडिओ कॉलर’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्यानंतर आता कॉलर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय त्यांच्या निर्णयावर ठाम असून कुनो राष्ट्रीय उद्यानच चित्त्यांसाठी योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेशातीलच ‘गांधीसागर’ आणि ‘नौरादेही’ अभयारण्य चित्त्यांसाठी तयार करण्यात येत आहे. येत्या डिसेंबपर्यंत ते तयार होण्याची शक्यता असून कुनोतील चित्त्यांना या अभयारण्यात सोडण्याची शक्यता आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात सध्या १४ प्रौढ चित्ते आणि सहा महिन्यांचा एक बछडा आहे. दरम्यान, चित्ता प्रकल्पाकरिता केंद्र सरकारने २०२१-२२ ते २०२५-२६ पर्यंत ३८ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.