नागपूर : २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत जवळपास ७८ देशांचा दौरा केला आहे आणि एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासांची संख्या ९२ इतकी आहे. या दौऱ्यांदरम्यान त्यांना विविध राष्ट्रप्रमुख, सरकारप्रमुख, सांस्कृतिक संस्था तसेच भारतीय समुदायाकडून शेकडो भेटवस्तू मिळाल्या आहेत. या भेटींमध्ये मॉन्टब्लँक कंपनीचे मौल्यवान घड्याळ, सिल्व्हर प्लाक, उच्च प्रतीच्या पेनांची सेट, चित्रकला व शिल्पकला वस्तू, स्मृतिचिन्हं, पुस्तके, फोटो अशा विविध गोष्टींचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशांच्या दौऱ्यांदरम्यान अनेक राष्ट्रप्रमुखांकडून भेटवस्तू मिळाल्या आहेत.
या भेटवस्तू भारतीय हस्तकला, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असतात. उदाहरणार्थ, कॅनडातून त्यांना ब्रास बोधी वृक्ष, साइप्रसहून काश्मिरी सिल्क कार्पेट आणि सिल्व्हर क्लच पर्स, अर्जेंटिनातून फुचसाइट दगडावर चांदीचा सिंह, ब्राझीलमधून वारली चित्रकला, फ्रान्समधून डोकऱ्याचे नंदी, ऑस्ट्रेलियामधून कोल्हापुरी सिल्व्हर कलश, इटलीमधून सिल्व्हर कँडल स्टँड, पुर्तगालमधून हस्तनिर्मित सिल्व्हर चेस सेट, नायजेरियामधून कोल्हापुरी सिल्व्हर कलश, आणि मेक्सिकोमधून वारली चित्रकला भेट म्हणून दिल्या गेल्या. या भेटवस्तू केवळ स्मरणचिन्ह नाहीत, तर त्या भारतीय संस्कृतीचा प्रचार करण्याचे आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून काम करतात.
उदाहरणार्थ, जपानच्या दौऱ्यात मोदींना बुलेट ट्रेनचे मॉडेल भेट मिळाले होते, जे भारत-जपान सहकार्याचे प्रतीक मानले गेले. नेपाळच्या दौर्यात त्यांना पाशुपतिनाथ आणि मुक्तिनाथ मंदिरांच्या प्रतिकृती भेट देण्यात आल्या, ज्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने विशेष महत्त्व आहे. अशा प्रकारे प्रत्येक देश आपापल्या परंपरा, संस्कृती आणि कूटनीतीनुसार भेटवस्तू देतो. मोदी यांना परदेशातून मिळालेल्या या वस्तू लिलावाच्या माध्यमातून विक्री केल्या जातात. यंदाही ही विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे.
कुठे होणार विक्री? किंमती काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-विदेशातून भेट म्हणून मिळालेल्या विविध वस्तूंचा नियमितपणे ऑनलाईन लिलाव केला जातो. या लिलावासाठी केंद्र सरकारने पीएम मेमेंटोझ नावाची अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे, जिथे सर्वसामान्य नागरिकांना या वस्तूंवर बोली लावण्याची संधी मिळते. या भेटवस्तूंमध्ये विविध देशांचे प्रमुख, राजकीय नेते, समाजातील संस्था तसेच व्यक्तींनी दिलेल्या स्मृतीचिन्हांचा समावेश असतो. स्मृतिचिन्हे, चित्रे, शिल्पकला, पारंपरिक वस्तू अशा अनेक दुर्मिळ व मौल्यवान वस्तू या लिलावात मांडल्या जातात. लिलावासाठी प्रत्येक वस्तूची सुरुवातीची किंमत निश्चित केली जाते आणि ऑनलाईन पद्धतीने नागरिक आपली बोली वाढवत नेतात. यंदा ही प्रक्रिया मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसापासून म्हणजेच १७ सप्टेंबर पासून ते गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यांच्या किंमती काही हजारांपासून ते कोट्यवधींच्या घरात राहणार आहेत.