नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ांमध्ये ८ ते १४ ऑक्टोबर या सात दिवसांच्या कालावधीत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले.  परंतु त्यात नागपूर शहर हद्दीतील एकाही रुग्णाची नोंद नसल्याने येथील खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूग्रस्तांची लपवा-छपवी सुरू असल्याची शंका पुन्हा उपस्थित होत आहे. शहरातील अनेक भागात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत असताना त्यात एकाही रुग्णाची नोंद नसल्याबाबत विविध सामाजिक संघटनांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

नागपुरातील विविध भागात आजही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत आहेत. येथील मेडिकल, मेयो या शासकीय रुग्णालयांसह महापालिकेच्या विविध दवाखाने व खासगी रुग्णालयांतील रुग्णसंख्येवरून ते दिसतही आहे. परंतु त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाला ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान एकाही रुग्णाची नोंद करता आली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात महापालिकेला सर्व खासगी रुग्णालयांकडून डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची माहिती दिली जाते काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर प्रत्यक्षात रुग्ण कमी झाल्याचा दावा केला. सध्या काही रुग्णांत डेंग्यूसदृश आजार आढळत असले तरी येथे व्हायरलचे रुग्ण वाढल्याने हा प्रकार दिसत असल्याचा त्यांचा अंदाज आहे.

सुरुवातीला रुग्णांची संख्या जास्त आढळली असली तरी कालांतराने महापालिकेने सर्वत्र तातडीने केलेल्या कीटकनाशक फवारणीसह जनजागृतीने त्यावर नियंत्रण मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान, विभागातील सहा जिल्ह्य़ात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान आढळलेल्या ४७ रुग्णांमध्ये नागपूर ग्रामीणचे २२, चंद्रपूर ग्रामीणचे ११, चंद्रपूर महापालिका हद्दीतील ४, गडचिरोलीतील १० रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांमुळे नागपूर ग्रामीणमधील आजपर्यंतच्या डेंग्यूग्रस्तांची संख्या १ हजार २०३, नागपूर शहरातील ७८५, वर्धेतील ४०१, भंडाऱ्यातील ५२, गोंदियातील १७७, चंद्रपूर ग्रामीणची २९५, चंद्रपूर शहरातील २५९, गडचिरोलीतील ५० अशी एकूण ३ हजार २२२ रुग्णांवर पोहचली आहे.

डेंग्यू हा नोटीफाईड आजार असून प्रत्येक रुग्णाची नोंद आवश्यक आहे. परंतु महापालिका हद्दीत सर्वत्र डेंग्यूसदृश रुग्ण आढळत असताना महापालिकेत एकही रुग्णाची नोंद नसणे गंभीर आहे. तातडीने आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना समज देत तेथे प्रत्येक रुग्णाची नोंद व माफक दरात उपचार होईल अशी यंत्रणा उभारावी. सोबत गरीबांवर शासकीय रुग्णालयांत दर्जेदार उपचाराची सोय करावी.

अनिकेत कुत्तरमारे, सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था.

डेंग्यूची स्थिती

(१ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२१)

जिल्हा                      रुग्ण        मृत्यू

नागपूर (ग्रा.)              १,२०३        ५

नागपूर (श.)               ७८५         ५

वर्धा                        ४०१         २

भंडारा                      ५२           १

गोंदिया                      १७७          ०

चंद्रपूर (ग्रा.)                 २९५          ४

चंद्रपूर (श.)                 २५९          ०

गडचिरोली                   ५०           ०

एकूण                       ३,२२२        १७