नरेंद्रनगरातील उद्यानात मलजल शुद्धीकरण प्लान्ट
शहरातील नदी-नाल्यांमध्ये गेल्या काही दिवसात मलजलचा प्रश्न गंभीर होत असताना महापालिका पाण्याच्या पुनर्वापरावर भर देत आहे. नदी-नाल्यांमधून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी उद्यानामध्ये वापरावे शिवाय बांधकामासाठी या पाण्याचा वापर करावा. त्यामुळे पिण्याचे पाण्याची बचत होईल, अशी सूचना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
मलजल शुद्धीकरण प्लान्ट उभारण्यासाठी जपानमधील मेसर्स डाईकी एक्सिस लिमिटेड या कंपनीने सहकार्य केले आहे. १० हजार लिटर प्रती दिवस क्षमतेचे हे मलजल शुद्धीकरण केंद्र (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्ट) जपानने विनामूल्य प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिले असून नरेंद्रनगरातील पीएमजी कॉलनीतील उद्यानामध्ये झालेल्या कार्यक्रमात महापालिकेला हस्तातंरण करण्यात आले. महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, अविनाश ठाकरे, जपानच्या डायको एक्सेस कंपनीचे संचालक हिरोशी ओगामे, व्यवस्थापक रुई ओवासा, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. शहराचा विकास करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना जपानच्या डायको एक्सेस या कंपनीने निर्माण केले असून प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. नागपूर शहरात २४ बाय ७ योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्यानंतर शहरातील विविध भागात पाण्याची समस्या फारशी राहिली नाही. एरवी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी मोर्चे काढले जात असताना नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. दहा हजार लिटर प्रती दिवस क्षमतेचे संयंत्र महापालिकेला देण्यात आले असून या संयंत्रामुळे नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्यानासाठी उपयोगात आणले जाईल. महापालिकेला हे संयंत्र नि:शुल्क प्राप्त झाले असून येणाऱ्या काळात ते शहरातील सर्व उद्यानात या संयंत्राची निर्मिती केली तर पिण्याच्या पाण्याचा भार कमी होईल. पिण्याच्या पाण्याचा भार कमी करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर, मल शुद्धीकरण क्रेंदापासून मिथेन गॅसचे परिवर्तन, सीएनजी गॅसचा उपयोग आदी योजना राबविण्यात येत आहेत. उद्यानाच्या मागे वाहणाऱ्या नाल्याच्या सांडपाण्यावर या संयंत्राच्या माध्यमातून प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होईल, असेही गडकरी म्हणाले.
महापौर प्रवीण दटके म्हणाले, नरेंद्रनगरमधील उद्यानाच्या बाजूला असलेल्या नाल्यातील पाणी संयंत्रामध्ये प्रक्रिया होऊन दहा हजार लिटर पाणी मिळणार आहे. महापालिकेने दहा हजार लिटर क्षमतेचे टाके तयार केले असून त्यातील पाणी उद्यानात वापरण्यात येणार आहे. या संयंत्राचा उपयोग शहरातील इतर उद्यानात करण्याचा मानस आहे. या प्रक्रियेमुळे पर्यावरणाचा समतोल साधण्यास मदत होईल व जमिनीतील पाण्याची घट कमी होईल, असेही दटके म्हणाले. संचालन अविनाश ठाकरे यांनी तर प्रास्ताविक मोहमंद इस्राईल यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिरोशी ओगामे म्हणाले, मलजल शुद्धीकरणाचे संयंत्र प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले. यापूर्वी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. या संयंत्र नाल्याजवळ बसवणार असून तीन टप्प्यात त्याची प्रक्रिया होईल. ५ लाख रुपये किमतीचे असलेले संयंत्र महापालिकेला भेट देण्यात आले आहे. शहरातील सर्व उद्यानांमध्ये किंवा इतर ठिकाणी ही योजना राबविली जाणार असेल आणि महापालिकेने मागणी केली तर त्याची निर्मिती करण्यात येईल. नागपूर शहरात या संयंत्राची निर्मिती करण्याचा विचार असल्याचे ओगामे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Process sewage water use for park and construction work says nitin gadkari
First published on: 30-05-2016 at 03:24 IST