नागपूर: उपराजधानीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) मेंदू शल्यक्रिया शास्त्र विभागातील वार्डात एका वरिष्ठ निवासी डॉक्टरने चक्क सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉक्टरला मारहाण केल्याची धक्कादायक माहिती आहे. या घटनेमुळे सहयोगी प्राध्यापकांच्या डोळ्याला इजा झाली असून थोडक्यात दृष्टी बचवल्याचे बोलले जाते.
एम्स अलिकडे विविध कारणांसाठी गाजत आहे. नुकतेच दोन दिवसांपूर्वी दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून मेडिको लिगल केस करण्यात येणार होती, परंतु या प्रकरणावर पडदा पडला होता. वॉर्डातून सुरु झालेल्या चर्चेसह एम्स प्रशासनाकडे झालेल्या तक्रारीतून हे प्रकरण पुढे आले.
एम्समध्ये न्युरोसर्जरी विभागात दुपारच्या वेळी ही घटना घडली. या विभागात सहयोगी प्राध्यापक डॉ. वॅरिड कटियार कार्यरत आहेत. त्यांनी वॉर्डात एका निवासी डॉक्टरला सर्वांसमोर रागावले. सर्वांसमोर रागावल्यामुळे निवासी डॉक्टरच्या मनावरचा ताबा सुटला. वॉर्डातच शुक्रवारी रुग्ण, नातेवाईक तसेच इतर उपस्थित निवासी डॉक्टरांसमोरच मारहाण केली. अचानक मारहाण झाल्यामुळे सहयोगी प्राध्यापकांना कळलेच नाही. या मारहाण प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली.
मारहाण करताना निवासी डॉक्टरकडून मनः स्ताप होत असल्यच्या भावना व्यक्त करीत होता. ड्युट्या उलटसुलट लावल्या जातात. नियमानुसार कामे सांगण्यात येत नाही. मारहाण झाल्याची माहिती तत्काळ विभागप्रमुख डॉ. आलोक उमरेडकर यांच्यापर्यंत पोहचली. सर्व विभागांमध्ये वाऱ्यासारखी ही घटना पसरली असून पोलिसांकडे तक्रार करण्यासंदर्भात चर्चा झाली, परंतु झालेल्या बैठकीत पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोचल्यास संस्थेची प्रतिमा मलिन होईल, असे सांगण्यात आले. या प्रकरणाची तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
विभागप्रमुख म्हणतात अशी घटनाच घडली नाही…
एम्समध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टराने सहयोगी प्राध्यापकाला मारहाण केल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर विभागप्रमुख डॉ. आलोक उमरेडकर यांच्याशी प्रसिद्धअध्यमातून संपर्क साधला असता, एम्समध्ये मारहाण झालीच नाही, असा दावा केला. दरम्यान इतर सरकारी रुग्णालयात हे प्रकरण घडले असेल असे सांगत होते. मारहाण झाल्याचे फेटाळून लावले.
शिक्षकांचे विद्यार्थ्यांवर वचक काय ?
केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा (प्राध्यापक) विद्यार्थ्यांवर चांगला वचक असतो. तो विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लागावी म्हणून असतो. परंतु एम्समधील घटनेने येथे विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले गेले की नाही? हा प्रश्न अनुत्तीर्ण आहे. तर तर भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून एम्स प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.