अमरावती : बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी यंदाही निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. येत्या २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून त्यानिमित्ताने होणाऱ्या वन्यप्राणी प्रगणनेसाठी मेळघाट व्‍याघ्र प्रकल्‍प क्षेत्रात तयारी पूर्ण झाली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत्या २३ मे रोजी निसर्गानुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मचाण बुकिंगची सुविधा गुरूवार १६ मे पासून ‘मॅजिकमेळघाट डॉट इन’ (magicmelghat.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निसर्गानुभव कार्यक्रमासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत १३१ मचाण उपलब्ध राहणार आहेत. या मचाणांवरून बुद्ध पौर्णिमेच्या लखलखत्या प्रकाशात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

२३ मे च्या रात्री आयोजित या निसर्गानुभव कार्यक्रमासाठी सिपना वन्यजीव विभागात २०, गुगामल वन्यजीव विभागात ३२, अकोट वन्यजीव विभागात ४४ आणि मेळघाट वन्यजीव विभागातील ३५ अशा एकूण चार वन्यजीव विभागात १३१ मचाणांची व्यवस्था केली आहे. १३१ मचाणांवर निसर्गप्रेमींना प्राणी न्‍याहाळण्‍याची संधी मिळणार आहे.प्रत्येक मचाणावर एका निसर्गप्रमीसोबत वनविभागाकडून एक गाईड किंवा वन कर्मचारी राहणार आहे. यासाठी निसर्गप्रेमींना शुल्कसुद्धा द्यावे लागणार आहे. २३ मे च्या रात्रीसाठी नोंदणी ही १६ मे च्या दुपारी ३ वाजतापासून सुरू होणार आहे.

हेही वाचा >>>सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या – जामनेरमधील घटना

वन्यप्राणी प्रगणनेच्या विविध पद्धती असून, त्यामध्ये प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष गणना केली जाते. ट्रॅप कॅमेऱ्यानेदेखील गणना होते. मात्र, नवखे निसर्गप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी यांना संपूर्ण रात्र जंगलात काढून त्याचा थरारक अनुभव लुटता यावा, त्यासोबतच दर्शन देणाऱ्या वन्यजीवांची गणना करता यावी म्हणून वन्यजीव विभागाच्या वतीने निसर्ग अनुभवाचे आयोजन केले जाते. या उपक्रमासाठी तयारीला वेग आला आहे. पाणवठ्यांची डागडुजी, त्यातील पाण्याची स्वच्छता, नव्याने शुद्ध पाणी पुरवठा करणे, पाणवठ्याशेजारी बांधलेल्या मचाणांची दुरुस्ती तसेच नवीन मचाणाची उभारणी आदी कामे सध्या सुरु आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प १९७४ मध्ये अस्तित्वात आला. या व्याघ्र प्रकल्पात पाच प्रमुख नद्यांचे पाणलोट क्षेत्र आहे. नैसर्गिकदृष्ट्या वाढलेल्या ७०० हून अधिक वृक्षांच्या प्रजाती मेळघाटात आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र १६७६.९३ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले आहे. वाघांचे जुने अधिवास क्षेत्र या भागात आहे. इतर व्याघ्र प्रकल्प हे पठारी भागांमध्ये असताना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोंगराळ प्रदेशाने या प्रकल्प क्षेत्राला वेगळेपण मिळवून दिले आहे. याशिवाय, गुगामल राष्ट्रीय उद्यान, कोलकास-धारणी, नरनाळा, वाण आणि अंबाबरवा अभयारण्ये देखील या भागात आहेत.