नागपूर : केंद्र सरकारच्या निधीतून नागपुरात उभारण्यात येणारा अपंगांसाठीचा ‘थीम पार्क’चा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रस्तावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचे कारण देत केंद्राने हा प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासकडे परत पाठवला होता. 

पूर्व नागपुरातील सूर्यनगर येथे नागपूर सुधार प्रन्यासकडून अपंगांसाठी ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार आहे. त्याला नागपूर सुधार प्रन्यास विश्वस्त मंडळाने १६ जून २०२२ ला मान्यता दिली. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. परंतु, त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्याचे कारण देत केंद्र सरकारने प्रस्ताव सुधार प्रन्यासकडे परत पाठवला होता. आता नासुप्रने स्वाक्षरी करून प्रस्ताव पुन्हा केंद्राकडे सादर केला आहे.

पारडीतील नासुप्रच्या भूखंडावर अपंगांसाठी ‘थीम पार्क’ उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निधीतून अपंग मुलांकरिता प्राथमिक शाळा व अन्य सुविधा येथे विकसित करण्यात येणार आहे. विशेष मुलांच्या गरजा लक्षात घेऊन येथे ‘स्पीच थेरपिस्ट’, ‘फिजिओथेरपिस्ट’, ‘व्होकेशनल ट्रेनर’ही उपलब्ध होणार आहेत. येथे मुलांना ‘ब्रेल लिपी’ वापरून संगीत ऐकता येईल, अंध मुलांना विविध फुलांचा सुगंध घेता येईल. अशा अनेक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

असा असेल थिम पार्क

अपंग मुलांचे शारीरिक स्वरूप आणि क्षमता लक्षात घेऊन मनोरंजनाची सर्व साधने येथे विकसित करण्यात येतील. यासाठी सुमारे पाच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला ‘खेलो इंडिया’ अंतर्गत निधी देण्यास केंद्रीय मंत्र्यांनी मान्यता दिली आहे. हा प्रकल्प नागपुरात यावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न आहेत. परंतु, प्रस्तावावर स्वाक्षरी नाही म्हणून प्रकल्पाचे काम लांबण्यात आले आहे. दरम्यान, हा पार्क एक ते दीड वर्षांत काम पूर्ण होईल, असा विश्वास नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.