अकोला : शासकीय जागेवरच चक्क देहव्यापार थाटल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये उघडकीस आला आहे.अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने बनावट ग्राहक पाठवून कुंटणखान्यावर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी ग्राहक पुरुष, दलाल महिला व पीडित महिलांना ताब्यात घेतले. कारवाईत मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अकोट शहरात मोठी खळबळ उडाली.

अकोट शहरातील आठवडी बाजार परिसरात मीना विजय पागृत (वय ६५ वर्षे, रा. नगरपालिकेजवळ, अकोट) या महिलेने शासकीय जागेवर ताडपत्रीचे छोटी खोली उभारली. त्या खोलीमध्ये देहव्यापार सुरू केला होता. त्याची गुप्तमाहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला मिळाली.

दलाल महिला ही बाहेरून गावावरून पीडित स्त्रियांना आणत ग्राहकांना पुरवत असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांकडून कुंटणखान्यावर एक बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्याच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये ताडपत्रीच्या खोलीमध्ये कुंटणखाना चालवणारी आरोपी मीना पागृत हिच्यासह ग्राहक आरोपी शिवा सदाशिव गौतम (रा. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) तसेच विविध ठिकाणांहून आणलेल्या पाच पीडित महिला आढळून आल्या आहेत.

आरोपींकडून रोख रक्कम, सात मोबाइल व इतर साहित्य असा एकूण दोन लाख ४४ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींवर कलम ३, ४, ५ अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारचे गैरकृत्य व अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत. असे कृत्य कुठे घडत असल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट सचिन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके मार्गदर्शनाखाली केली आहे. या कारवाईत सपोनि कविता फुसे, सपोउपनि सुरज मंगरूळकर, पोहेका प्रदीप उंबरकर, पोहकॉ दिनेश शिरसाट, पोहेकॉ विशाल मोरे, मपोहकॉ वैशाली रणवीर, मपोहकॉ पुनम पातोंड, मपोहेकॉ शिल्पा मगर, चालक भागवत काळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सुलतान पठाण, सतीश पवार, प्रशांत कमलाकार व दोन साक्षीदार सहभागी झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट शहर पोलिसांकडून केला जात आहे.