शेतकरी मदत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धारेवर धरणार असल्याचे सूतोवाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करून शिवसेनेने आपला शब्द पाळावा, अशी मागणी करत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. त्यामुळे अशा सरकारच्या चहापानाला  जाणार नाही, असे फडणवीस यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खातेवाटपावरून सुरू असलेला गोंधळ, सावरकरांबद्दलचे राहुल गांधी यांचे विधान, शेतकरी कर्जमाफी व अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत या मुद्दय़ांवर सत्ताधारी महाविकास आघाडीमधील विसंवादावर बोट ठेवत सरकारला धारेवर धरण्याची व  शिवसेना व काँग्रेसमधील दरी वाढवण्याचे व त्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती भाजपने आखल्याचे संकेत फडणवीस यांच्या विधानांमधून मिळाले. महाविकास आघाडीने सत्तेत येताच विकासकामांना स्थगिती दिली आहे. सरकारच्या धोरणांमध्ये सातत्य नसल्यास त्याचा फटका राज्यातील गुंतवणुकीला बसू शकतो, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

राज्य सरकारच्या विचारांमध्ये विसंवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी प्रेम असणारे आता मवाळ भूमिका घेत आहेत. सत्तेसाठी किती लाचारी ठेवायची हे शिवसेनेने ठरवायचे आहे. राहुल यांच्या  विधानामुळे देशभरात संताप आहे. आम्ही गांधी-नेहरूंना मानतो म्हणून तुम्ही सावरकरांना मानावे ही शिवसेनेची भूमिका सत्तेसाठीच्या सौदेबाजीची असून अशी सौदेबाजी त्यांनाच लखलाभ असो, असा हल्ला फडणवीस यांनी शिवसेनेवर चढवला.

मुनगंटीवार अनुपस्थित : भाजपमधील असंतोष बाहेर येत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेस भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित होते. मुनगंटीवार हे विरोधी पक्षांच्या बठकीला व नंतर पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मुनगंटीवार परिषदेला गरहजर होते.

आशिष शेलार भाजपचे मुख्य प्रतोद :  भाजप विधिमंडळ

पक्षाने आशिष शेलार यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. तर देवयानी फरांदे या विधानसभेतील प्रतोद असतील. शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. भाजपने माजी मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना यावेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती.

‘सरकारमध्ये विसंवाद’

* सरकारचा शपथविधी होऊन अनेक दिवस लोटले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तीन पक्षांतील विसंवादामुळे खातेवाटप अजून झालेले नाही.

* त्यामुळे कोणाला प्रश्न विचारायचे, कोण उत्तर देणार, उत्तर देणाऱ्यांकडे ते खाते राहील की नाही, उत्तरदायित्व आहे की नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

* मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यामुळे नागपूर अधिवेशनाबाबत हे सरकार गंभीर नाही हे स्पष्ट होत आहे. केवळ अधिवेशनाचा फार्स केला जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protesters boycott tea on savarkar case abn
First published on: 16-12-2019 at 00:51 IST