नागपूर : दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबई, कोकण या भागात पावसाने कहर केलाच आहे, पण विदर्भातील काही जिल्ह्यात देखील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता पावसामुळे चक्क नाल्याचा काठावर असलेले सार्वजनिक शौचालय वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
मराठवाड्यासह विदर्भाला देखील पावसाने जोरदार झोडपले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिमुसळधार पावसाने ठाण मांडले आहे. तर मुंबईसह परिसरामध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान, विदर्भातील अकोला जिल्ह्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शिवपूरा आणि बोर्डी परिसरात जोरदार पाऊस झाला. बोर्डी गावातील घोगा नाल्याला पूर आल्याने पुरात एक घर वाहून गेले. तर याच गावात ग्रामपंचायतीने बांधलेले शौचालयही पुरात वाहून गेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गावकऱ्यांची या नाल्यावर संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली होती. मात्र, संरक्षण भिंत बांधल्या गेली नाही. परिणामी नाल्याला आलेल्या पुरामुळे घर वाहून गेले. तर त्याचवेळी नाल्याच्या काठावर ग्रामपंचायतीने बांधलेले सार्वजनिक शौचालय देखील वाहून गेले. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज आणि उद्या जोरदार पाऊस
बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि २७ जुलैपर्यंत तो मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५-२६ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे. पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. सध्याच्या अंदाजानुसार २६ तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे.