नागपूर : घर भाड्याने देण्याची जाहिरात संकेतस्थळावर टाकणे एका वृद्धाला महागात पडले. सायबर गुन्हेगाराने लष्करात अधिकारी असल्याची थाप मारून दोन महिन्यांचे आगाऊ भाडे पाठवण्याच्या नावावर फसवणूक केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी सतीश उद्धव चिमलवार (६५) रा. बेसा यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला आहे. चिमलवार हे शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना त्यांचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी एका संकेतस्थळावर यासंबंधीची जाहिरात टाकली होती. त्यात त्यांचा मोबाईल क्रमांकदेखील होता.

ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व सैन्यात अधिकारी असल्याची बतावणी केली. दिल्लीतून कामठीत बदली झाल्याने तातडीने घर हवे असल्याचे त्यांना सांगितले. त्याने लष्कराशी संबंधित त्याची कागदपत्रेदेखील पाठविली. त्यामुळे चिमलवार यांचा त्याच्यावर विश्वास बसला.त्याने दोन महिन्यांचे आगाऊ भाडे देण्याच्या नावाखाली १६ हजार रुपये पाठवतो, असे सांगून १ रुपयाच पाठवला. चिमलवार यांनी एकच रुपया मिळाल्याचे सांगताच त्याने त्यांना पेटीएमचा ‘क्यूआर’ कोड पाठवण्यास सांगितले. तसेच येस बँकेचा खाते क्रमांक व ‘आयएफसी कोड’ नमूद करून टाकण्यास सांगितले. चिमलवार यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून १६,००० रुपये वळते झाले.

हेही वाचा : प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्कारी पिढ्या निर्माण करते ; देवेंद्र फडणवीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमलवार यांनी त्याला ती रक्कम परत मागितली असता त्याने तशीच प्रक्रिया करण्यास सांगितली व त्यांच्या दोन बँक खात्यातून एकूण १ लाख ९२ हजारांची रक्कम त्याच्या येस बँकेच्या खात्यात वळती करून घेतली.त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिमलवार यांनी बेलतरोडी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. चौकशीत येस बॅंकेच्या खातेधारकाचे नाव मयंक नागर असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.