नागपूर : काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळ परिसरात आढळलेला बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाही. दरम्यान, या बिबट्याचे आवडते खाद्य म्हणजे कुत्रे त्या परिसरात असल्याने आणि त्यावर बिबट्याने ताव मारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बिबट्याने त्याठिकाणी ठाण मांडले असूनही वनखात्याला त्याला जेरबंद करणे कठीण जात आहे.

पुणे विमानतळ परिसरातील वसाहतीतील लोकांमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच याठिकाणी बिबट असल्याची कुजबुज सुरू होती. तर २८ एप्रिलला पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ एक बिबट्या दिसल्याने आणि तशी अधिकृत तक्रार पुणे वनखात्यात करण्यात आल्यामुळे वनअधिकारी आणि वन्यजीवतज्ञ एका आठवड्याहून अधिक काळापासून “हाय अलर्ट”वर होते. चोवीस तास देखरेख करूनही तो वनखात्याच्या हाती काही लागला नाही. त्याठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबट्याचे छायाचित्रे आले नसले तरीही बिबट्याची उपस्थिती निश्चित असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, त्याच्या हालचाली अद्याप अस्पष्ट असल्याचे देखील ते म्हणाले. लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या तळाशी असलेल्या पुणे विमानतळावर मात्र यामुळे विमानांच्या उड्डाणामध्ये कोणताही व्यत्यय आल्याचे वृत्त नाही. उच्च सुरक्षा असलेल्या परिसरात बिबट्याच्या उपस्थितीमुळे सार्वजनिक सुरक्षा आणि वन्यजीव व्यवस्थापन या दोन्हींबद्दल चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थेची चमू देखील घटनास्थळी आहेत. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी आणि सुरक्षितपणे पकडण्यासाठी विस्तीर्ण परिसराच्या मोक्याच्या ठिकाणी लाईव्ह सर्व्हिलन्स कॅमेरे आणि ट्रॅप पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. कॅमेरा ट्रॅपची ठिकाणे बदलली जात आहेत आणि फेरबदल केले जात आहेत, असेही वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी डीसीएफने सांगितले.

सापळ्याचे पिंजरे आणि लाइव्ह कॅमेरे सक्रिय असल्याने देखरेख सुरू आहे. पुणे विमानतळाचा हा परिसर अतिशय मोठा आहे. तसेच याठिकाणी त्याचे खाद्य असलेले कुत्रे आणि पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बिबट्याचा मुक्काम याठिकाणी आहे. दोन दिवसांपूर्वीच या परिसरात बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे लक्षात आले. मात्र, तरीही बिबट्याचा वावर धावपट्टीच्या जवळपास असल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सखोल प्रयत्नांनंतरही, बिबट्या आतापर्यंत पकडण्यापासून वाचला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या प्रयत्नात सातत्याने बदल घडवून शक्य तितक्या लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत असल्याचे वनखात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.