नागपूर : पावसाळ्यात पाणी जमिनीत झिरपत असल्याने बिळातून साप बाहेर पडण्याचे प्रमाण वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी शहरातील एका बँकेत अजगर निघाला. तर आता कारच्या ‘बोनेट’ मध्ये चक्क अजगराचे पिल्लू निघाले.सर्पमित्रांनी मात्र शिताफीने अजगराचे रेस्क्यू करुन कारमालकाला सुरक्षित केले. तर त्याचवेळी अजगराच्या पिल्लाला देखील नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.

अमरावती मार्गावरील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड येथे रमेश वझलवार यांना त्यांच्या कारच्या बोनेटमधून साप बाहेर डोकावताना दिसला. त्यामुळे ते घाबरले, पण त्याचवेळी कोणताही धोका न पत्करता त्यांनी ताबडतोब स्थानिक सर्पमित्र हर्षल शेंडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना मदतीसाठी बोलावले. हर्षल शेंडे यांनी जराही वेळ न दवडता घटनास्थळ गाठले व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी तो साप नाही तर ते अजगराचे पिल्लू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बारचे बोनेट उघडताच अजगराचे पिल्लू गुंडाळलेल्या स्थितीत त्यांना दिसून आले. त्यांनी अतिशय सुरक्षितपणे त्याला पकडले आणि नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

हर्षल शेंडे यांनी अतिशय सुरक्षितरित्या अजगराचे पिल्लू बाहेर काढल्याने कारमालकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला. आठ दिवसांपूर्वी शहरातील मनिषनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे सुमारे अडीच फूट लांबीचा साप आढळला. बँकेचे कर्मचारी सकाळी बँकेत गेले असताना त्यांना कॅबिनमध्ये अडीच फुट लांबीचा साप दिसला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यावेळी देखील हेल्प फॉर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या सर्पमित्रांनी सुरक्षितपणे सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. तर या घटनेच्या काही दिवसांपूर्वी वर्धा रोडवर चिचभवन येथील भवन्स स्कूलसमोर रस्त्यावर पाच फूट लांबीचा अजगर आढळला होता. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरीही बिळातून साप, अजगर बाहेर निघण्याचे प्रमाण वाढत आहे.

या दोन्ही घटना शहरातच घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. तसेच अशी घटना घडल्यास त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे. अजगराची ही प्रजाती विषारी नसली तरीही अचानक समोर आल्यानंतर सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण होते. बरेचजण सापाला मारण्याचा किंवा कोणताही अनुभव नसताना पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशावेळी सर्पदंश होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वत: कोणतीही कृती न करता प्रशिक्षीत सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन हर्षल शेंडे यांनी केले.