नागपूर : पावसाळा आणि साप हे समीकरण आता ठरलेले आहे. पावसाळ्यात कुठे ना कुठे सापांचे अस्तित्व आढळून येते. आता तर मोठमोठे अजगर देखील रस्त्यावर यायला लागले आहेत. नागपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर चक्क अजगराने ठाण मांडले आणि वर्दळीच्या या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली.

शहरातील वर्धा मार्गावरील चिंचभवन येथे भवन्स विद्यालय आहे. या विद्यालयासमोरील रस्त्यावर चक्क अजगराने ठाण मांडले. अजगराला पाहताच याठिकाणी लोकांची गर्दी जमली. एकीकडे भीती असली तरी गर्दी काही कमी होत नव्हती. त्याचवेळी गर्दीत काहींनी ही माहिती हेल्प फॉर अनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर या संस्थेला दिली. ही माहिती मिळताच संस्थेचे सर्पमित्र आशीष खाड़े, सचिन काकडे, सचिन झोड़े, विश्वजीत उके, विशाल कनेर यांनी घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

गर्दीला दूर सारत संस्थेच्या स्वयंसेवकांनी त्या पाच फूट लांबीच्या अजगराला शिताफीने पकडले. अजगर जेरबंद होताच लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचे निराकरण करुन अजगर स्वस्थ असल्याची खात्री करुन त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडले गेले. हा सांप बिनविषारी असुन वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत शेड्यूल एक मध्ये येतो.

पावसाचे दिवस सुरु झाल्या पासुन ग्रामीण भागासह शहरात देखील साप घरात कंपाउंड मध्ये शिरल्याच्या घटना वाढत जात आहेत, हेल्प फॉर अनिमल वेल्फेअर असोसिएशन नागपूर या संस्थेला दररोज असंख्य कॉल येत आहेत. सध्या साप मनीष नगर, बेसा, पिपला, बेलतरोडी, चिंचभवन, खापरी, मनीष नगर, नरेंद्र नगर, जयताला, सोनगांव, पारडी, कोराडी रोड, खरबी, दिघोरी, उमरेड रोड, नरसाला, हुडकेश्वर या क्षेत्रात जास्त प्रमाणात निघत आहेत, यात विषारी, बिनविशारी सांपाचा समावेश आहे. पावसाळ्याच्या दिवसात जमिनीत पाणी अधिक झाल्याने, साप बाहेर येतात व कोरडा जागेच्या झुडपी क्षेत्र, मोकाट रहिवासी परिसरात साप निघण्याचे प्रमाण अत्याधिक झाले आहे.

काय काळजी घ्यावी

शेतात काम करीत असताना पायात लांब बुटचा वापर करावा, घराच्या परिसरात अथवा कम्पाउंडमध्ये असलेल्या बिनकामाच्या वस्तूंची विल्हेवाट लावावी. परिसरात स्वछता बाळगावी, घरासभोवताल असलेली अनावश्यक वेली, झुडपे काढून टाकावी, ड्रेनेज पाईपला जाळी बसवावी, जमिनीवर झोपत असल्यास घराच्या दरवाजाच्या खालील फटीत कापड लावावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडत असताना टॉर्चचा वापर करावा. सर्पदंश झाल्यास साप शोधण्यास, साप मारण्यात वेळ घालवू नये, साप चावल्यास घाबरू नये, मानसिक संतुलन स्थिर ठेवावे वेळ न गमावता त्वरित जवळचे शासकीय रुग्णालय गाठावे ग्रामीण भागातील लोकांनी प्राथमिक स्वास्थ केंद्र रुग्णालय गाठावे, असे आवाहन संस्थेचे सर्पमित्र व माजी पशुकल्याण अधिकारी स्वप्निल बोधाने यांनी केले आहे.