नागपूर : अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्था बघता संसदेप्रमाणेच नागपुरातील विधान भवनातही प्रवेशासाठी मध्यवर्ती ‘बार कोड’ पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. विधानभवन परिसर विस्तारीकरण्याबाबत शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागपूरमध्ये १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.

अधिवेशन परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मोजक्या व सुरक्षित प्रवेशासाठी संसदेच्या धर्तीवर मध्यवर्ती बारकोड पद्धतीचा अवलंब व्हावा, प्रवेशिका स्कॅन केल्यावरच प्रवेश द्यावा, अशी सूचना नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आतमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी, प्रत्येक मंत्री व आमदारांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशिका, विधान भवन परिसरातील महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीची आवश्यक प्रसाधन व्यवस्था, महिला आमदार यांची आमदार निवासातील व्यवस्था, अधिवेशनासाठी विदर्भाच्या दुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी बस व्यवस्था याबाबत सूचना केली. लवकरच मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल व त्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातील कालावधी व अन्य महत्त्वपूर्ण घोषणा होतील, असेही यावेळी नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: नागपूर: पीएचडीसाठी संशोधकांकडून पैसे उकळले!; धर्मेश धवनकरांचा नवीन घोटाळा उघड

सेंट्रल हॉलची गरज
भविष्यात विधान भवन परिसराचा विस्तार करण्यात येईल. विधिमंडळ परिसरात मध्यवर्ती सभागृहाची (सेंट्रल हाॅल) नितांत गरज आहे. मात्र त्यासाठी जागा कमी पडत आहे. जागा संपादित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे, असे नार्वेकर म्हणाले.

माध्यमांची संख्या १६००
नागपुरात माध्यमांची संख्या १६०० असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली. दिवसेंदिवस माध्यमांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विधान परिषद आणि सभेतील पत्रकार दीर्घेतही जागा अपुरी पडते. हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाबाहेर मंडप टाकून सभागृहातील सर्व सोयीसुविधा पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘२०२४पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार येईल’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बच्चू कडूंचा खोचक टोला; म्हणाले, “जेलमध्ये एखादी मातामाय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही
दोन वर्षानंतर अधिवेशन होत असल्यामुळे नार्वेकर यांनी नागपुरातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील आढावा घेतला. विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील. मोर्चे, त्यांचे नियंत्रण, भेटीचे ठिकाण, शिष्टमंडळाच्या भेटी येथील सुरक्षेबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी माहिती दिली. आमदार निवासात महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यावर्षी अधिवेशनासाठी दहा हजारावर पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील, असे त्यांनी सांगितले.