अमरावती : मध्य रेल्वेकडून तिकिटांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात सातत्याने कडक कारवाई केली जात आहे. रेल्वेचे तत्काळ आरक्षण देण्यात होत असलेली दलाली थांबवण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न होत असले तरी दलालांचा सुकाळ आहे. नियमित प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या सततच्या प्रयत्नांमध्ये, मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) अनधिकृत तिकीट विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
अशाच एका कारवाईदरम्यान मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आरपीएफने चांदूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन ‘उपलब्ध’ अंतर्गत एका अनधिकृत तिकीट विक्रेत्याला अटक केली. त्याच्याकडून ३ हजार ५१५ रुपयांची तिकिटे जप्त करण्यात आली असून रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरपीएफचे कर्मचारी चांदूर रेल्वे येथील या दलालावर नजर ठेवून होते. हा दलाल अनधिकृत पद्धतीने तिकिटांची विक्री करीत असल्याचा संशय आरपीएफच्या कर्मचाऱ्यांना होता. कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करताना या अनधिकृत तिकीट विक्रेत्याला अटक केली.
आरपीएफ ही प्रवाशांची उत्तम सुरक्षा, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणासाठी एक प्रमुख सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. रेल्वे संरक्षण दल आज रेल्वे आणि त्याच्या ग्राहकांच्या बदलत्या सुरक्षेच्या गरजा ओळखून काम करते. रेल्वे प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तत्काळ तिकीट मिळविण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. आता तिकीट खिडक्यांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
९.१६ लाखांचा दंड वसूल
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकाच दिवशी २३ रेल्वे गाड्यांमध्ये मोठी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरमयान १ हजार ४३० अनियमिततेची प्रकरणे आढळून आली आणि त्यातून ९.१६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अनेक जण विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. दंड टाळण्यासाठी वैध तिकिटांसह प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
रेल्वे स्थानकांसह रेल्वेगाड्यांमधील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेमार्फत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते. यात फुकट्या प्रवाशांवर बडगा उगारण्यात येत आहे.