गोंदिया: छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात डोंगरगड येथे मा बमलेश्वरी चे प्रसिद्ध देवस्थान आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा राज्य आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या डोंगरगढ येथील माँ बमलेश्वरीच्या पवित्र तीर्थस्थळाचे दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यांमधून भाविक प्रवासी रेल्वेगाड्यां मधून येत आहेत. या मुळे नवरात्राच्या पंचमीपासून या मार्गावरील धावणाऱ्या प्रत्येक गाड्यांमध्ये इतकी गर्दी आहे की त्यावरून भाविकासह इतरही प्रवाशांना प्रवास करणे आव्हानात्मक बनले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या  गोंदिया ते डोंगरगढ दरम्यान धावणाऱ्या प्रवासी गाड्यांमध्येही असेच दृश्य पाहायला मिळते. गोंदिया ते डोंगरगढ या गाड्यांमध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

 गोंदिया रेल्वे स्थानकही गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी भरगच्च भरलेले आहे. तथापि, भाविकांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने रायपूर-डोंगरगढ मेमू ६८७२९ डोंगरगढ येथून रात्री ११:४० वाजता सुटते आणि पहाटे १:२० वाजता गोंदियात पोहोचते. दरम्यान, डोंगरगढ-गोंदिया मेमू ६८७३० गोंदियाहून पहाटे १:४५ वाजता सुटते आणि पहाटे ३:२० वाजता डोंगरगढ येथे पोहोचते या अधिक च्या गाड्या सुरू केलेल्या आहेत याव्यतिरिक या मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना सुद्धा डोंगरगड येथे २१ सप्टेंबर  ते २ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत दोन मिनिटाच्या थांबा दिलेला आहे.

 तथापि, भाविक प्रवाशांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या भाविक प्रवाशांनी भरगच्च भरून जात आहेत. बमलेश्वरी मंदिर डोंगरगड येथे जाणाऱ्या भाविकांची नवरात्राच्या पंचमीपासून वाढलेली गर्दी कमी होण्याचा नाव नाही घेत आहे. शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी गोंदिया रेल्वे स्थानकावरिल १ ते ६ क्रमांकाच्या फलाटावर पाय ठेवण्याकरिता सुद्धा जागा नाही अशीच काहीशी परिस्थिती होती. यापेक्षाही जास्त विदारक स्थिती रेल्वेगाडीतील बोगीची होती. दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेतील शौचालयाची जागा सुद्धा बसण्याकरिता अपुरी पडेल अशीच काहीशी परिस्थितीत भाविक प्रवाशी प्रवास करत असल्याचे दिसून आले. यात मोठ्या संख्येने चांदाफोर्ट- गोंदिया मेमू, बल्लारशा – गोंदिया मेमू गाडी आणि कटंगी – बालाघाट – गोंदिया, जबलपूर- बालाघाट – गोंदिया या रेल्वे गाड्यांनी गोंदिया पर्यंत येऊन पुढे डोंगरगडला जाणाऱ्या गाड्यांची वाट बघणारे प्रवासी अधिक संख्यांमध्ये गोंदिया स्थानकावर आलेले आहेत. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही याच्या फटका बसत असून त्यांनाही या भाविक प्रवाशांमुळे त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर भाविक प्रवाशांची गर्दी आणि रेल्वेतील बोगीमधील ही भाविक प्रवाशांची गर्दी ही   नवरात्र दरम्यान अष्टमी आणि पुढील १ आक्टोंबर पर्यंत अश्याच परिस्थिती राहणार असल्याची माहिती गोंदिया रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर मृत्युंजय रॉय यांनी दिली आहे.