अकोला : सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत नागपूर – पुणे, अमरावती – पुणे विशेष गाड्या २९ ऑक्टोबर रोजी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गर्दीच्या काळात मोठी सुविधा होईल.

भारतीय रेल्वेकडून दिवाळी व छठ पूजा सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. या सण विशेष गाड्यांमुळे कोट्यवधी प्रवाशांचा प्रवास सुकर आणि सुलभ होण्याची अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली. देशभरातील विविध ठिकाणांसाठी सोयीस्कर प्रवास पर्याय उपलब्ध करून देण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे. मध्य रेल्वेकडून २९ ऑक्टोबरला एकूण १९ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यापैकी आठ विशेष गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत, अशी माहिती भुसावळ मंडळाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी दिली.

गाडी क्रमांक ०१४०९ पुणे – नागपूर विशेष पुणे येथून २०.३० वाजता सुटेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चालिसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ११ शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना राहील. गाडी क्रमांक ०१४०४ अमरावती – पुणे विशेष अमरावती येथून १२.०० वाजता सुटणार आहे. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबा राहणार आहे. चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी गाडीची संरचना राहणार आहे. गाडी क्रमांक ०१४०२ नागपूर – पुणे विशेष नागपूर येथून १६.१० वाजता सुटणार आहे. वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे गाडी थांबेल. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, १३ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी गाडीची रचना राहणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.