बंगालच्या उपसागरातील ‘पेथाई’ चक्रीवादळाने ढगाळ वातावरण

नागपूर : बंगालच्या उपसागरात थडकलेल्या ‘पेथाई’ चक्रीवादळाचा परिणाम विदर्भावर जाणवत आहे. ढगाळ वातावरणासह बोचऱ्या थंडीने पूर्व विदर्भाला हुडहुडी भरली आहे. तसेच नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. ‘पेथाई’ वादळामुळे आंध्रप्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड, पाँडेचेरी, झारखंड तसेच अंदमान-निकोबारमध्ये पाऊस झाला.

उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला असून तेथून जोरदार थंड वारे वाहत आहे. राज्यात देखील बोचरी थंडी जाणवत आहे. उन्हाळ्यात तापणाऱ्या पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसात हुडहुडी भरवणारी थंडी आहे. कोकण किनारपट्टीलगत वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्यामुळे तापमानात चढउतार होत आहे.

किमान तापमान वाढूनही बोचऱ्या थंडीने हुडहुडी

ढगाळ वातावरण असले तर किमान तापमान वाढल्याने थंडी जाणवत नाही. पूर्व विदर्भात मात्र वेगळे चित्र असून ढगाळ वातावरण असले तरी बोचरी थंडी जाणवत आहे. विदर्भातील किमान तापमानाचा पारा कमी होण्याऐवजी वाढला आहे. कालपर्यंत १०.५ असणारे नागपूर शहराचे तापमान सोमवारी थेट १५.६ वर पोहोचले.  सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या चंद्रपुरात देखील थंडीमुळे काश्मीरसारखी स्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि थंडीने नागरिकांना हैराण केले आहे. नागपूर शहरातील अनेक भागात तसेच यवतमाळ जिल्ह्यातदेखील पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. वर्धा जिल्ह्यातसुद्धा शहरासह सेलू तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला जिल्ह्यत देखील ढगाळ वातावरणाबरोबर कडाक्याची थंडी आहे.

विदर्भातील सोमवारचे किमान तापमान

नागपूर –              १५.६

अकोला –            १४.५

अमरावती –        १५.६

बुलडाणा –          ११.६

ब्रम्हपूरी –           १५.०

चंद्रपूर –            १३.४

गडचिरोली –    १४.२

गोंदिया –          ११.५

वर्धा –              १७.७

वाशिम –         १३.०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यवतमाळ –     १५.०