नागपूर : मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदाही लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे. राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तराखंड राज्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून, वायव्य भारतातून मोसमी पावसाच्या परतीसाठी अद्यापही पोषक स्थिती नाही. वायव्य भारतात पावसाने उघडीप दिल्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी २० सप्टेंबरला मोसमी पावसाचे वारे राजस्थानातून माघारी फिरले होते. मोसमी पावसाचे आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांच्या सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही त्याच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र सध्या राजस्थानसह वायव्य भारतातील राज्यांत हलक्या स्वरुपात पाऊस सुरू आहे. तसेच या भागात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार होत असल्याने मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्यास आणखी उशीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २० सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
हेही वाचा – भिडेना कारागृहात चक्की पिसायला लावणार – वडेट्टीवार
माघारी फिरल्यानंतर मोसमी पावसाच्या परतीची वाटचाल अडखळली. महाराष्ट्रातून मोसमी पावसाच्या परतीची वाटचाल सुरू होण्यास १४ ऑक्टोबरचा दिवस उजाडावा लागला. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मोसमी पावसाचे वारे संपूर्ण देशातून परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले होते. यावर्षी मोसमी पावसाचे केरळमधील आगमन ८ जूनपर्यंत लांबले. तळ कोकणात ११ जूनला दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील प्रगतीसाठी वाट पाहावी लागली. २३ जूनला राज्यातील पुढील वाटचाल सुरू केलेल्या वाऱ्यांनी दोनच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर नियमित सर्वसाधारण वेळेच्या ६ दिवस आधीच म्हणजेच २ जुलैला मोसमी पाऊस संपूर्ण देशभरात पोहोचला होता.
वायव्य भारतात पावसाने सलग पाच दिवस उघडीप देणे. आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन कोरडे हवामान होणे, वाऱ्यांची दिशा बदलण्याबरोबरच परिसरावर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक असते. त्यानंतरच या भागातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात येते.