अकोला : दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या आहे. या पावसामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस कोसळला. या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा सण आहे. या काळात घरांना दिव्यांनी आणि दिव्यांच्या रांगांनी सजवले जाते.
दिवाळीमध्ये रांगोळ्या काढणे, फराळाच्या पदार्थांची देवाणघेवाण करणे, फटाके फोडणे आणि नवीन कपडे घालणे यासारख्या अनेक परंपरा आहेत. नातेवाईक आणि मित्रांसह आनंद साजरा केला जातो. दिवाळी केवळ घरांना सजवण्यासाठी नाही, तर जीवनातील ज्ञान आणि प्रकाशाचे स्मरण ठेवण्यासाठी आहे. हा सण प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाचा आणि आनंदाचा दीप चेतवण्यासाठी आहे. वर्षभरातील सर्वात मोठा सण दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून दिवाळीची तयारी करण्यात आली. आता मात्र, ऐन दिवाळीमध्ये पावसाचे संकट आले.
विदर्भातून मान्सून परतल्याने वातावरणात कोरडेपणा आला आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. ऐन दिवाळीत २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांच्या काळात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात मोठा पाऊस किंवा अलर्ट नसला तरी, हलक्या सरींचा अंदाज होता. गेले काही दिवस शहरात पावसाची हजेरी लागलेली नव्हती. हवामान कोरडे होऊन दिवसा ऊन, तर रात्री आणि पहाटे थंडी जाणवत होती.
दरम्यान, ऐन दिवाळीच्या उत्साहात अकोला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आज मंगळवारी सकाळी वातावरण सामान्य होते. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील विविध भागात हा पाऊस झाला. बहुतांश भागात हलक्या व काही भागात मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी पाऊस पडल्याने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. दिवाळीतील आणखी पुढच्या दोन दिवसात देखील हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पावसामुळे व्यावसायिकांची धावपळ
दिवाळीनिमित्त बाजारपेठ गर्दीने फुलल्या आहेत. अचानक पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून वस्तूंचा बचाव करण्यासाठी एकच धावपळ झाली. फुटपाथ व्यावसायिकांचे नुकसान देखील झाले आहे.