अकोला : अकोला, वाशीम जिल्ह्यात पावसाचा कहर कायम असून शेतकऱ्यांचे उभे पिके पाण्यात गेले. सोयाबीन पिकाला कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे वाशीम जिल्ह्यात पूलच वाहून गेला. काही मार्ग बंद आहेत. अकोला जिल्ह्यात सुद्धा पूर्णा नदीचे पाणी शेतात शिरले. एक बैलबंडी देखील वाहून गेली. मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे.

हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार अकोला, वाशीम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तुरळक, तर विविध भागात मुसळधार पाऊस पडला. अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३१.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक पातूर तालुक्यात ५०.५ मि.मी. पाऊस झाला असून अकोट ३३.७, तेल्हारा ३१.९, बाळापूर २४.१, अकोला ३४.१, बार्शीटाकळी ३३.४ व मूर्तिजापूर १७.५ मि.मी. पाऊस पडला आहे. पातूर तालुक्यात निर्गुणा नदीच्या प्रवाहात आलेगाव येथील शेतकऱ्याची बैलबंडी वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

स्थानिक युवकांनी बैलबंडी वाहून न जाण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेमध्ये एका बैलाचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आले. जिल्ह्यातील काटेपूर्णा, पूर्णा नद्यांच्या पूर पातळीमध्‍ये वाढ होत आहे. पूर्णा नदीचे पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात सव्वा लाखावर शेतकऱ्यांच्या शेतीचे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. नुकसान भरपाईसाठी ९२ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. पावसामुळे नदी, नाले, तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात नाल्यामध्ये काल वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्यापही शोध लागलेला नाही.

वाशीम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सरासरी ३०.४ मि.मी. पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात दोन लाख १० हजार शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख ३७ हजार ६१९ एकर पिके उद्ध्वस्त झाली. १५१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील चोरद ते जन्मला मार्गावरील पूल पावसामुळे वाहून गेला. त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू केले. सेंदोना गावाचा संपर्क तुटला आहे. बोरव्हा ते सिंगडोह रस्ता पावसामुळे क्षतीग्रस्त झाला. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.