चंद्रपूर : राजुरा मतदारसंघात बोगस मतदारांच्या नोंदणीसाठी फॉर्म आले होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र, भाजप अध्यक्षांच्या तक्रारीनंतर बोगस मतदार नोंदणी झाली नाही. काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे राजुरा येथे मतांचे ‘ॲडिशन किंवा डिलीशन’ झाले नाही, अशी माहिती राजुराचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी दिली.

तर राजुरा मतदारसंघात किमान ११ हजार बोगस मतदार होतेच. त्यांची नावे वगळली गेली नाहीत, असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी पुन्हा एकदा केला आहे. विशेष म्हणजे, राजुरा बोगस मतदार प्रकरणी प्रत्येकाच्या मनात शंकाकुशंका असून ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला. त्यानंतर राजुरा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. त्यावर आमदार भोंगळे व माजी आमदार सुभाष धोटे यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदार भोंगळे म्हणाले, ‘काँग्रेस नेते फक्त माध्यमांमध्ये मत चोरीचा आरोप करून सनसनाटी निर्माण करतात. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव होताच ईव्हीएम यंत्रणेवर, निवडणूक आयोगावर खापर फोडणे सुरू केले आहे.

प्रत्यक्षात असे काहीही नाही. मतचोरीचा आरोप करून काँग्रेस पुन्हा एकदा लोकांना भ्रमित करीत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस पक्षाने संविधान विषय काढून मतदारांना भ्रमित केले. त्यामुळे काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला. मात्र, त्यानंतर राज्यात भाजप व महायुती सरकारने लोकोपयोगी कामे केली. लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, मोफत बस तसेच इतर घोषणा केल्या. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकीत विजयी झाला असेही भोंगळे म्हणाले.

जवळपास तीन हजार मतांनी पराभव झालेले काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी निकालानंतर पराभवाचे विश्लेषण केले. त्यात धोटे यांना अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. लोकसभा निवडणुकीनंतर या मतदारसंघात १८ हजार मते वाढली. एवढी माते कशी वाढली, याचा संशय आल्याने धोटे यांनी निवडणुकीपूर्वी तक्रार केली. त्यावरून सुमारे सहा हजार ८६१ मते आयोगाने कमी केली. उरलेल्या अकरा हजार मतांमध्येही बोगस मतदार असल्याचा आरोप धोटे यांचा आहे. कर्नाटकात काँग्रेसची मते वगळण्यात आली, तर राजुरा येथे भाजपने बोगस मतदार वाढवले, असा आरोप आहे. लगतच्या तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र या राज्यातील लोकांना इथे मतदार दाखवण्यात आल्याचा आरोप धोटे यांनी केला.