अमरावती : दोन तोंडाचा साप सापडणे ही तर अत्यंत दुर्मिळ बाब. पण, वन्‍यजीव संरक्षणाच्‍या क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका संस्थेच्या कार्यकर्त्याला यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथे घराजवळच एका झाडावर हा साप आढळून आला. त्याची हालचालही मंदावलेली होती. हा साप वेगळ्या वैशिष्ट्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे.

वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे (वॉर) यवतमाळ सर्कल अध्यक्ष विकास बारेकर यांना हा साप दिसला. कवड्या जातीच्या या सापाला दोन वेगवेगळी डोकी होती. सहा ते सात इंच लांबीचा हा साप पहाटेच्या वेळी आढळून आला. विकास बारेकर हे सर्पमित्र देखील आहेत. त्यांनी या सापाचे काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि त्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची खात्री त्यांनी केली. त्यानंतर ‘वॉर’ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सापाचा सुखरूप बचाव करून तो पुन्हा निसर्गात मुक्त केला, अशी माहिती वॉर संस्‍थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी दिली.

नीलेश कंचनपुरे यांनी अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे डॉ. हेमंत सपकाळ यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. दुहेरी तोंड असलेला साप, ज्याला द्विमुखी साप असेही म्हणतात, हा एक अत्यंत दुर्मिळ जैविक प्रकार आहे. हा प्रकार भ्रूणाच्या अपूर्ण विभाजनामुळे निर्माण होतो. या विकृतीमुळे एका सापाला दोन तोंडे (डोकी) असतात, आणि ही दोन्ही डोकी अन्न व इतर संसाधनांसाठी एकमेकांशी स्पर्धा करतात, त्यामुळे अशा सापांचा वनात टिकाव धरणे कठीण ठरते.

साधारणतः असे साप थोड्या काळासाठीच जिवंत राहतात, परंतु योग्य काळजी घेतल्यास ते दीर्घकाळ जगू शकतात. या सापाच्या दोन्ही डोक्यांचे स्वभाव वेगवेगळे असू शकतात आणि ते वेगवेगळ्या दिशेने हलण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे समन्वयात अडचणी निर्माण होतात. दोन्ही डोकी खाऊ शकतात, परंतु एका डोक्याचे वर्चस्व जास्त असते आणि ते आधी खाते.

काही वेळा दोन्ही डोकी एकाच वेळी अन्न घेण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे स्पर्धा निर्माण होते. असे दोन डोकी असलेले साप चिडखोर स्वभावाचे असू शकतात आणि काही वेळा स्वतःलाच चावतात. हे वर्तन कधी कधी त्यांना आपले शरीर स्थिर ठेवण्यासाठी मदत करते, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचे नीलेश कंचनपुरे यांनी सांगीतले.

दोन तोंडे असलेला साप आढळणे ही दुर्मिळ अशी घटना मानली जाते. विकास बारेकर यांनी या सापाचे जिओ टॅगिंग असलेले छायाचित्र काढून या सापाला पुन्हा निसर्गात मुक्त केले.