अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना निमंत्रित करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कमलताई गवई यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले खरे, पण त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना संघाच्या कार्याचे कौतुकही केले.

येथील नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणात आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांच्या नावे पत्र लिहून कमलताई गवई यांनी आपण अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असे कळवले आहे. कमलताई गवई यांनी पत्रात म्हटले आहे की, मानवी जीवन मानवी मुल्यांनी विकसित झाले असून भारतीय संस्कृती आणि सभ्यता जगाच्या परिप्रेक्षामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. भारत हा प्राचीन काळापासून धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दृष्टया जगाचा आदर्श राहिलेला आहे.

तथागत बुध्द, वर्धमान महाविर, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, स्वामी विवेकांनद रामास्वामी पेरियार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक महापुरुषांनी मानवी मूल्यांना विकसित करणारी थोर परंपरा भारतामध्ये निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता यांच्या आधारावर भारतीय संविधानाची उभारणी केली ती आज भारताला आणि भारतीय नागरिकांना विकासाकडे घेऊन जात आहे. भारत हा सामाजिक, सांस्कृतिक, भाषिकदृष्टया वैविध्याने नटलेला देश असून आजपर्यंत लोकशाही मुल्यांना केंद्रवरती ठेऊन त्याची विकासाकडे वाटचाल चालू आहे. भारताला आपल्याला एकजीव व सक्षम असे राष्ट्र म्हणून निर्माण करायचे असून समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष यांच्या माध्यमातूनच निर्माण करता येईल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनाही उपरोक्त मानवी आणि संविधानिक मुल्यांच्या माध्यमातून भारताला सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्याची अधिक संधी आहे. आज दि. ०५ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दीपुर्ती विजयादशमी उत्सव संपन्न होत असून सदर कार्यक्रमास मी काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नाही. या कार्यक्रमासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

कमलताई गवई यांनी सुरुवातीला या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते, पण वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी सविस्तर पत्र लिहून आपली भूमिका मांडली. आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.