अकोला : बंजारा समाजाच्यावतीने शहरातील नेहरु पार्क चौकात बुधवारी दुपारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. बंजारासह १४ विमुक्त जमातीची आरक्षणरुपी चोरी गेलेली संपत्ती वापस मिळेपर्यंत बंजारा समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशारा गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिला.
अशोक वाटिका चौकातून मोर्चा काढत नेहरू पार्क चौकात आंदोलक धडकले. विमुक्त जाती-अ प्रगर्वात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र मिळवणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकारी, लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक गठित करावे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अ प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा, २०१७ चा रक्त नातेसंबंधीचा शासन आदेश त्वरित रद्द करण्यात यावा, दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व व्हीजे अ प्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका व जिल्ह्यातील यादी बार्टी करून जाहीर करण्यात यावी आदींसह इतर मागण्यांसाठी संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा >>>कळंबोलीत बेपत्ता विद्यार्थीनीचा प्रियकरानेच केला खून
पोलिसांनी अडवल्याने आंदोलनकारी आक्रमक भूमिका घेतली होती. बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याने लक्ष वेधून घेत होत्या. बंजारा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा संदेश चव्हाण यांनी दिला. प्रा.अनिल राठोड, विदर्भ अध्यक्ष मनोहर राठोड, जिल्हाध्यक्ष कुलदीप चव्हाण, उपाध्यक्ष शिवराज जाधव, जिल्हा महासचिव योगेश पवार, आतिश राठोड आदींसह पदाधिकारी व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.