अकोला : बोगस शिधापत्रिकांचा घोटाळा उघडकीस आला आहे. एकाच दिवसात बनावट शिधापत्रिका प्रत्येकी तीन हजार रुपये देऊन दलालाने वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात घडला. तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली.
पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. पैसे घेऊन काम करून देण्याच्या नावावर दलाल सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. आता तर चक्क बनावट शिधापत्रिकाच तीन हजार रुपयात तयार करून नागरिकांना त्याचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
शहरातील गजानन सुरवाडे नामक दलालाने बनावट शिधापत्रिका तयार केल्या आहेत. तीन हजार रुपये घेऊन एका दिवसातच त्याने शिधापत्रिका तयार करून त्याचे वाटप केले. त्या शिधापत्रिका मिळालेले नागरिक नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अन्न पुरवठा विभागात गेले. त्या ठिकाणी त्यांना मोठ्या धक्काच बसला. त्यांच्या शिधापत्रिकांवर दिलेल्या क्रमांकाची आधीच नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दलालाने या बनावट शिधापत्रिकांचे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मोठी उमरी भागातील लक्ष्मीप्रकाश चाटसे यांच्याकडून तीन हजार रुपये घेत एका दिवसातच त्यांना बनावट शिधापत्रिका देण्यात आली. उमरी भागातील अनिता संतोष इंगळे यांच्याकडून देखील तीन हजार घेत त्यांना बनावट शिधापत्रिकाचे वाटप करण्यात आले आहे. या दोन्ही बनावट शिधापत्रिकांवर टाकण्यात आलेल्या क्रमांकाची अगोदरच शिवर परिसरातील नागरिकांच्या नावाने पुरवठा विभागामध्ये नोंदणी झालेली आहे. या बनावट शिधापत्रिकांवरील निरीक्षण अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि पुरवठा विभागाचा शिक्का देखील खोटा असल्याचे समोर आले आहे.
बनावट शिधापत्रिकांच्या दोन तक्रारी; चौकशी सुरू
बनावट शिधापत्रिकांच्या दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची संपूर्ण चौकशी केल्या जात असल्याची माहिती तहसील विभागातील अकोला ग्रामीण पुरवठा विभाग अधिकारी विश्वजित लिंगायत यांनी दिली. या प्रकरणात तहसील विभागाने चौकशी समिती गठीत केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. बनावट दोन्ही शिधापत्रिका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या प्रकरणात संबंधितांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आले आहेत. या प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक करून बनावट शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले? याची माहिती चौकशी दरम्यान घेतली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.