अमरावती : ज्या ग्राहकांकडे पाणी पुरवठ्याच्या देयकांची मोठी थकबाकी आहे अशा ग्राहकांची नळ जोडणी कापा. अनधिकृत नळ कनेक्शन घेणारे व पिण्याच्या पाण्याचा अतिवापर करणाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा. त्यांची नावे फलकांवर प्रसिद्ध करा. वर्तमानपत्रात द्या. तरच सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल, असे आदेश आमदार रवी राणा यांनी सोमवारी दिले.

अप्पर वर्धा धरणात पुरेसा पाणी साठा आहे. उद्योग, शेतीसाठी आरक्षण असलेल्या पाण्याचा वापरही कमी आहे. तरीही पाणी टंचाई कशी? हे या पुढे चालणार नाही, असे खडेबोल त्यांनी सुनावले. आमदार रवी राणा यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मालटेकडी येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीला प्रभारी मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, अधीक्षक अभियंता संतोष गव्हाणकर, कार्यकारी अभियंता विवेक सोळंके, उपकार्यकारी अभियंता संजय लेवरकर, एकशे पाच गावे पाणीपुरवठा योजना उपकार्यकारी अभियंता विजय लोखंडे, शाखा अभियंता मोरेश्वर आजणे आदी उपस्थित होते. आमदार रवी राणा यांनी  या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शहरी आणि ग्रामीण लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. ज्या ठिकाणी पाणी पोहोचत नाही, त्यांच्या संदर्भात नियोजन करून वेळापत्रक तयार करावे, अशी सूचना केली.

अधिकाऱ्यांना बाहेर पाठवले

बेलपुरा, फॉरेस्ट कॉलनी, राहुल कॉलनी, यशोदा नगर, नवाथे, जेवड नगर, मोती नगर, चैतन्य कॉलनी परिसर, बडनेरा नवी वस्ती व जुनी वस्ती इत्यादी ठिकाणच्या तक्रारी वाढतच गेल्या. नागरिकांच्या भावना संतप्त झाल्यामुळे संबंधित भागाचे शाखा अभियंता मोरेश्वर आजने यांना आमदार रवी राणा यांनी बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले. ही सर्व कामे मंजूर करून पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पुढे सुधारणा करा. बैठकीमधून हाकलण्याची वेळ येऊ देऊ नका. आम्ही १ हजार कोटी रुपये खर्चाची योजना राज्य सरकार, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणतो. तुम्ही अधिकारी मात्र नियोजन करत नाही. ज्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून आम्हाला नागरिक जबाबदार ठरवतात. हे या पुढे चालणार नाही, अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अधिकाऱ्यांनी नियोजन न केल्याने मुबलक पाणी असूनही पाणीटंचाई असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.