वर्धा : रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवार्ती बँक आहे. याच बँकेद्वारे देशभरातील बँक व्यवहाराचे नियमन होत असते. धनादेश असो की ऑनलाईन व्यवहार याच बँकेने त्याबाबत दिशा ठरवून दिली आहे. देशभरातील विविध बँकाच्या लाखो शाखा या बँकेच्या नियम बदलाने प्रभावित पण होत असतात. आताही तसेच झाले आहे. पण ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर झालेला हा बदल बँक खातेदारांना घायकुतीस आणणारा ठरत आहे.

४ ऑक्टोबर पासून रिझर्व्ह बँकेने नवा बदल केला आहे. त्याची सूरू झालेली अंमलबजावणी ऐन दिवाळीत खातेदार नागरिकांसाठी अडचणची ठरत असल्याचे विविध बँकेत दिसून येत आहे. याआधी बँकेत धनादेश टाकला की तो दिवसातून दोन वेळा क्लिअरन्सला जात असे. एकदा दुपारी बारा वाजता तर दुसऱ्यांदा दुपारी ३ वाजता क्लिअर करण्याची प्रक्रिया होत असे. आता तसे होणार नाही. चेक क्लीअर करण्याची प्रक्रिया आता २४ तास सुरू राहील. बँक शाखेस चेक आला त्यास दिवशी तो क्लीअर करावा लागणार.ग्राहकांच्या खात्यावर त्याच दिवशी पैसे जमा व्हायला पाहिजे. हा बदल ग्राहकांच्या सुवेधेसाठी असल्याचा रिझर्व्ह बँकेचा दावा आहे. यामुळे त्वरित पैसा खात्यात उपलब्ध होईल. सोयीचा व्यवहार ठरेल. खातेदाराने आपल्या खात्यात पुरेसे पैसे ठेवणे अपेक्षित असल्याचे रिझर्व्ह बँकेचे पत्रक म्हणते.

पण हा नवा बदल अद्याप पाहिजे तसा सुरळीत झाला नसल्याचे दिसून येत आहे. कारण ऑनलाईन असलेल्या या पद्धतीत एकाच वेळी देशात लाखो चेक एका दिवसात जमा करण्यास आले. परिणामी सर्व्हर वर ताण पडला. प्रक्रिया मंद झाली. ४ ऑक्टोबरचा चेक अद्याप वटला नाही, असा अनुभव सामाजिक कार्यकर्ते गिरीश काशीकर यांनी सांगितला. यामुळे सध्या विलंब होत असला तरी ही प्रक्रिया लवकरच सोपी होईल असा विश्वास नागरी बँकेचे व्यवस्थापक अडसूले यांनी व्यक्त केला.

मात्र असंख्य बँक खातेदार चेक क्लीअर नं झाल्याने पैश्याचे व्यवहार करू शकलेले नाही. ऐन दिवाळीत अश्या नाराज ग्राहकांचा सामना बँक व्यवस्थापणास करावा लागत असल्याचे दिसून येते. तसेच रिझर्व्ह बँकेने खात्यात पुरेसे पैसे ठेवण्याची सूचना केली आहे. कारण जर धनादेश वटला नाही म्हणजेच तो बाउन्स झाला तर मोठा दंड पडू शकतो. नव्याने क्लीअर व्हायला वेळ लागणार. म्हणून काळजी घेतलेली बरी.

पण हा बदल स्वागतर्ह असला तरी ऐन सणास झालेला बदल त्रस्त करणारा ठरत असल्याचे गिरीश काशीकर म्हणतात. फार आधी किंवा दिवाळी नंतर बदल करायला हवा होता, असे ते म्हणतात. आणखी एक पूर्वसूचना आहे. ३ जानेवारी २०२६ पासून असे चेक केवळ केवळ तीन दिवसात क्लीअर करण्याची सुविधा सुरू होईल.