भंडारा : हवामान विभागाने २५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आज जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. असे असतानाही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अवहेलना चक्क शासकीय विद्यालयांकडूनच होत असल्याचे समोर आले आहे.

२५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अतिवृष्टी झाल्यास कुठलीही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर पडू नये, यासाठी भंडारा जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी जाहीर केली.

तरीही भंडारा परिचर्या प्रशिक्षण विद्यालय (शासकीय नर्सिंग विद्यालय) आज नियमितपणे सुरू होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला शासकीय विद्यालय केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद करण्याचे आदेश दिले तर त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. शासकीय विद्यालयच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान करीत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे बोलले जात आहे.

नर्सिंग विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती उईके यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नर्सिंग कॉलेज हे एक प्रकारे इमर्जन्सी डिपार्टमेंट असते, त्यामुळे आम्ही केव्हाही सुट्टी देऊ शकत नाही. पंधरा दिवसांपूर्वी देखील जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती त्यावेळी आम्ही दोन दिवस कॉलेज बंद ठेवले होते मात्र आज पावसाचे फारसे वातावरण नव्हते, शिवाय ए.एन.एम द्वितीय वर्ष आणि जी.एन.एम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असल्याने आज आम्ही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली नाही. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची परवानगी घेतली आहे.

जबाबदार कोण?

शासकीय नर्सिंग महाविद्यालयाची विद्यालयाच्या ज्या इमारतीत एएनएम आणि जीएनएमचे वर्ग भरतात त्यातील काही वर्गखोल्या या जीर्ण झालेल्या आहेत. अशा जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थी अध्ययन करतात. आज फारसा पाऊस नसल्याने सुट्टी न दिल्याचे कारण प्राचार्यांनी पुढे केले असले तरी जीर्ण वर्ग खोल्यांमुळे कोणतीही अनुचित प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय?

शासकीय नर्सिंग विद्यालयात शिकणारे अनेक प्रशिक्षणार्थी हे बाहेर गावाहून येत असतात. सध्या पावसामुळे सर्वत्र नदी, नाले ओसंडून वाहत आहेत त्यामुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. असे असताना शासकीय नर्सिंग विद्यालयाने विद्यार्थ्यांना बोलावून घेणे कितपत योग्य आहे, प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलता आली नसती का असा प्रश्न काही पालकांनी उपस्थित केला आहे.