बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ६१ सदस्य संख्या असलेली जिल्हापरिषद,  १३ पंचायत समित्या आणि ११ नगर परिषदाच्या निवडणुका नजीकच्या काळात लागणार आहेत. यामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असताना  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गटाच्या) जिल्हा अध्यक्ष रेखा खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यावर शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी जुन्याजाणत्या  नेत्या व चिखलीच्या  माजी आमदार रेखा खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  मराठा सेवा संघांचे संस्थापक  अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अर्धांगिनी असल्याने त्यांना वेगळे वलयं लाभले होते. मात्र जिल्ह्यात लवकसरच स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीचा रण संग्राम रंगणार असतानाच रेखा खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांनी  लढाईपूर्वीच तलवार म्यान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. खेडेकर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे सादर केला असून, त्यात त्यांनी “मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने देत आहे. कृपया तत्काळ स्वीकारावा,” अशी विनंती केली आहे. तथापि, त्यांनी राजीनाम्याचे सविस्तर कारण किंवा पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केलेली नाही.

पुढे काय?

दरम्यान  या राजीनाम्या विषयी विचारणा केली असता  पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यानी  राजी नाम्याच्या वृत्तांला दुजोरा दिला. प्रकृती वा वैयक्तिक  कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असावा असा अंदाज त्यांनी वर्तविला. मात्र त्या अन्य पक्षात जाणार नाही किंबहूना पक्षातच राहतील असा दावा पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला.