देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर : शहरातील करोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याने येथील निर्बंध शिथिल करावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. स्थिती नियंत्रणात असताना संपूर्ण शहराला वेठीस धरणे अयोग्य असल्याचे त्यांनी पत्रात नमूद के ले आहे.

यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याच संदर्भात शासनाकडे पत्र पाठवले होते, हे येथे उल्लेखनीय. राज्यात ज्या भागात करोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि स्थिती नियंत्रणात आहे तेथे र्निबधांबाबत फेरविचार करून त्यात शिथिलता देण्याची गरज आहे.

नागपुरात १७ ते २७ जुलै या दहा दिवसांत ५९,९४८ चाचण्यांपैकी ५८ बाधित आढळले. हे प्रमाण ०.१० टक्के आहे. त्यामुळे नागपुरातील निर्बंध शिथिल करण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे. नागपुरात दररोज  सरासरी ५ रुग्ण आढळून येत असताना संपूर्ण शहर बंद ठेवणे योग्य नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

सततच्या र्निबधांमुळे व्यापार संपत चालला आहे आणि त्यातून अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. छोटे दुकानदार, व्यवसायी यांना जगणे कठीण होऊन बसले आहे. हॉटेल्सचा व्यवसाय खरे तर दुपारी ४ नंतर सुरू होतो. पण, ४ वाजता सारे बंद करावे लागत आहे. आर्थिक विवंचनेमुळे  जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये राज्यात वाढ होत आहे. चंद्रपुरात भोजनालय चालकाने आत्महत्या केली, इतर ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे  र्निबधात तातडीने शिथिलता देण्याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.