लोकसत्ता टीम

अमरावती: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. ऐनवेळी मात्र तिला लग्नास नकार देण्यात आला. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- अमरावती: बदनामीच्या भीतीपोटी अल्पवयीन बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

अमित अशोक येवतकर रा. अमरावती असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी व अमित यांची जून २०२० मध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर त्यांच्यात संवाद वाढला. अशात दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात अमितने पीडित तरुणीचा विश्वास संपादन करीत लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतरही त्याने अनेकदा पीडित तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडित तरुणीने अमितला लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. त्यावर अमितने पीडित तरुणीला स्पष्ट शब्दांत लग्नास नकार दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्वासघात झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमितविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास आरंभला.