लोकसत्ता टीम
अमरावती: बलात्कार झाल्यानंतर बदनामीच्या भीतीपोटी पीडित १४ वर्षीय मुलीने विषारी औषधी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. ही घटना दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
रवी गणेश इंगोले (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रवीने पीडित १४ वर्षीय मुलीशी आरोपीने प्रेमसंबंध जोडले. त्याने तिला लग्नाचे आमिषसुद्धा दाखवले. ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर दबाव टाकला. त्यानंतर रवीने पीडित मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. वारंवार होत असलेल्या अत्याचाराने पीडित मुलगी प्रचंड घाबरली. याबाबत कुटुंबीयांनाही सांगता येत नसल्याने ती मानसिक तणावात आली. अखेर बदनामीच्या भीतीपोटी तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तिने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले.
आणखी वाचा- नागपूर: समृद्धीचे वाटकरू ठरले वानरासाठी देवदूत! आईने पिलासाठी जीव गमावला, पिल्लाला वाटसरुनी वाचवले
ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर तिला तातडीने दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे समोर आले. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालय प्रशासनाने याबाबत दर्यापूर पोलिसांसह बाल कल्याण समितीला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी बाल कल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत पीडित मुलीचे बयाण नोंदवले. तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी पीडित मुलीचे बयाण व तिच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रवीविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.