अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून अकोला आणि वाशीम जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांना धक्का बसला, तर काहींचे मतदारसंघ कायम राहिल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती आली आहे. अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी ५२ गटांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात काढण्यात आली. त्यानुसार प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आज प्रसिद्ध झाली.
अकोला जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीनुसार, अनसूचित जातीसाठी एकूण १२ जागा (महिलांसाठी सहा), अनुसूचित जमाती एकूण पाच जागा (महिलांसाठी तीन), नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग १४ जागा (सात महिला), सर्वसाधारण २१ जागा (महिला १०) अशा प्रकारे एकूण ५२ (महिला २६) आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद गट आरक्षणामध्ये माजी उपाध्यक्ष, माजी सभापती, माजी विरोधी पक्ष नेते आदींसह अनेक नेत्यांचे गट आरक्षित झाल्याने त्यांची चांगलीच कोंडी झाली. त्यांना आता पर्यायी गटाचा शोध घ्यावा लागेल. माजी अध्यक्षांसह काही नेत्यांच्या गटाचे आरक्षण कायम राहिल्याने मोठा दिलासा मिळाला.
वाशीम जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी जि.प.निवडणूक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. वाशीम जिल्हा परिषद गटांमध्ये अनुसूचित जाती एकूण ११ जागा सर्वसाधारण पाच, महिला सहा, अनुसूचित जमाती एकूण चार जागा सर्वसाधारण व महिला प्रत्येकी दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण १४ जागा सर्वसाधारण व महिला प्रत्येकी सात, सर्वसाधारण एकूण २३ जागा सर्वसाधारण १२, महिला ११ अशा एकूण ५२ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. वाशीम जिल्ह्यात सुद्धा आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे. पर्यायी गटाचा शोध सुरू झाला, तर काहींसाठी ही आरक्षण सोडत दिलासादायक ठरली.
हरकती सादर करण्यास १७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत
जिल्हा परिषद गट प्रारूप आरक्षण अधिसूचना आज प्रसिद्ध झाली. त्यावर हरकती असल्यास १७ ऑक्टोबरपूर्वी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले.