चंद्रपूर : राज्य शासनाने राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागेवर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नेमणुका देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे डी.एड, बी.एड धारक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींची थट्टा केली जात आहे.
या निर्णयाला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने विरोध करीत सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार डी. एड, बी. एड. धारकांना तात्काळ नेमणुका देण्याची मागणी केली आहे. सेवानिवृत्त कर्मचारी हा वयोमानानुसार निवृत्त होत असतो. वयोमान झाल्यामुळे कार्य करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये नसते तर काही कर्मचारी विविध वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छा निवृत्ती घेत असतात.
निवृत्तीच्या काळात त्यांना शासन योग्य ते निवृत्तीवेतन देत असते. त्यामुळे त्यांनाच पुन्हा नियुक्ती देणे उचित नाही. जे डी.एड, बी.एड धारक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आहेत ते गरजवंत असतात व कामाच्या शोधात असतात. त्यामुळे मिळेल त्या कामाला योग्य न्याय देण्याचा ते प्रयत्न करू शकतात. त्यामुळे या बेरोजगार युवकांकडे शासनाने आणि प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना तात्पुरत्या स्वरुपाच्या नियुक्त्या द्याव्यात. यासाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षण संघटना राज्य शासनाकडे पाठपुरवा करणार आहे.
प्रसंगी योग्य तो लढा पुकारून बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे यांनी दिले आहे.