नागपूर : विदर्भात वाघांची आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत एवढी वाढली की आता मानव-वाघ आणि मानव-बिबट संघर्ष असणाऱ्या गावातील तरुणांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. हा प्रश्न आहे तो गावातील तरुणांच्या लग्नाचा. वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे त्या गावांमध्ये कुणी मुलगी देण्यासाठीच पुढे येईना. त्यामुळे कुटूंब, घर आणि व्यवस्थित मिळकत असूनही त्यांच्या लग्नाचे स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याच्या हल्ल्यांमध्येही वाढ होत आहे. अलीकडच्या काही दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मानवी मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिक यांचा यात बळी जात आहे. मात्र, असे असले तरीही आयुष्याचे चक्र काही थांबणार नाही. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या घडामोडी घडतच आहेत. यातच आता वन्यप्राण्यांची दहशत असणाऱ्या गावातील तसेच आजुबाजूच्या गावांमधील तरुणाई लग्नासाठी सज्ज होत असतानाच या गावांमध्ये मुली देण्यास मुलींचे आईवडील मात्र नकार देत आहेत.
मुलामुलींचे लग्न हे सध्याच्या काळात आव्हानच ठरत आहे. यात आता मुलाइतकेच मुलीची पसंती देखील ग्राह्य धरली जात आहे. त्यातच त्यांच्या अपेक्षा, आर्थिक व सामाजिक स्थिती या गोष्टीदेखील पाहिल्या जातात. अशातच आता पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांनी नवे आव्हान उभे केले आहे. बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि बिबट्याच्या हल्ल्यांमध्येही दिवसागणिक वाढ होत आहे. बिबट्याच्या दहशतीने नवे सामाजिक संकट उभे केले असताना मुलीचे पालक याठिकाणी मुलीच्या लग्नासाठी नकार देत आहेत. हल्लेखोर बिबट या लग्नातील अडथळा ठरत आहे.
बिबट्याच्या दहशतीत असणाऱ्या या गावातील तरुणांची स्वप्न आता अधांतरी आहेत. या गावांमध्ये सोयरिक जमेनाशी झाली आहे. सगळे काही व्यवस्थित असताना फक्त बिबट्याच्या भीतीपोटी या गावांमध्ये पालक त्यांची मुलगी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे लग्नही रखडलेली आहेत. जिथे गावकरीच दहशतीखाली जगत आहेत, जिव मुठीत घेऊन जगत आहेत, तिथे मुलगी द्यायचीच कशी असा प्रश्न मुलीच्या पालकांनाही पडला आहे. तर मुलींनी देखील या गावांमध्ये जाण्यास नकार दिला आहे. या गावांमध्ये बिबट्याची दहशत असल्यामुळे कोणतेच पालक या गावांमधील तरूणांशी आपल्या मुलीचे नाते जोडण्यास तयार नाहीत. मुलीही या गावांत येण्यास आणि जीव धोक्यात टाकण्यास नकार देत आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे सोयरिकच नाकारली जात आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे विवाहसंबंधांवर परिणाम होणे हे ग्रामीण भागातील नवीन आणि चिंताजनक वास्तव ठरत आहे.
