लोकसत्ता टीम
नागपूर: आजच्या धकाधकीच्या काळात लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंतच्या सर्वांचे झोपेचे गणित बिघडले आहे. योग्य झोप नसल्यास संबंधितांना मधुमेह, लठ्ठपणा, झोपेचे आजार, उच्च रक्तदाबासह इतरही आजारांची जोखीम वाढते, असे निरीक्षण मेडिकलच्या श्वसन व निद्रारोग विभागाने नोंदवले आहे.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत भ्रमणध्वनी वापरण्याचा, बघण्याचा वेळ खूपच वाढला आहे. करोना काळात टाळेबंदीमुळे या वेळात आणखीनच वाढ झाली. त्यामुळे मोठ्या संख्येने मुलांसह इतरांच्या झोपेचे तास कमी झाले. परिणामी झोपेच्या आजारांना निमंत्रण मिळाले. शरीरातील मिलॅटोनियम कमी झाल्यामुळे झोपेचे आजार वाढतात. बदलत्या जीवनशैलीमुळे याचे प्रमाण वाढले आहे.
आणखी वाचा- नागपूर: रक्षणकर्ताच बनला भक्षक! विदेशी पाहुण्यांसाठी महापालिकेने…
एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के नागरिकांना झोपेशी संबंधित आजार आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये ४० टक्के झोपेचे आजार अधिक आहेत. रात्री पाय दाबल्याशिवाय झोप न येणेही एक आजार आहे. रात्री पाळीत सेवा देणारे कर्मचारी अथवा वारंवार सेवेची पाळी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही झोपेशी संबंधित समस्या जास्त आढळतात. कारण सूर्य निघण्यापासून मावळण्यापर्यंतच्या क्रियेत शरीरातील पेशींवर परिणाम होतात. त्याचा झोपेशी संबंध राहत असल्याचेही मेडिकलच्या श्वसन व निद्रारोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुशांत मेश्राम यांनी सांगितले.
कुणाला किती झोप हवी?
साधारणपणे एक वर्षाखालील मुलांना १५ ते १८ तास, १ ते ५ वर्षापर्यंतच्या मुलांना १२ तास, ५ ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांना १० तास, १२ वर्षांहून जास्त वयाच्या मुलांना किमान ८ तास झोप आवश्यक आहे.
-प्रा. डॉ. सुशांत मेश्राम,
विभागप्रमुख, श्वसन व निद्रारोग विभाग प्रमुख, मेडिकल, नागपूर.