नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितू मालू हिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले नाही असा दावा सत्र न्यायालयात केला. चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर राहिल्यावर पोलिसांनी बेकायदेशीररित्या अटक केली आणि कागदोपत्री तसे बळजबरीने लिहून घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रितूने पोलिसांवर लावला. रितू मालूच्या अटकेसाठी तसेच प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाविरोधात तहसील पोलिसांनी सत्र न्यायालयात दोन पुनर्विचार याचिका दाखल केल्या आहे. याचिकेवर सत्र न्यायाधीश एस.यू.हाके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान रितूने आपली बाजू मांडली.

रितूला हिला तहसील पोलिसांनी १ जुलै रोजी अटक केली होती. रितूने न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार, तिच्या पतीने तपास अधिकारी संदीप बुआ यांना अटकेच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी ईमेलच्या माध्यमातून तसेच सायंकाळी ६ वाजता व्हाट्सॲपच्या माध्यमातून रितू तपासासाठी हजर राहण्यासाठी तयार असल्याचा संदेश पाठविला. यानंतर सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी तपास अधिकारी यांनी रितूच्या पतीला फोन करत पोलीस स्थानकात तात्काळ हजर राहण्यासाठी सांगितले.

हेही वाचा >>>रोजगार संधी, प्रदुषण मुक्ती, अन् बरेच काही, अर्थसंकल्पाकडून वैदर्भीयांना या आहेत अपेक्षा

मात्र, सायंकाळची वेळ असल्याने रितू दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्थानकात गेली. यावेळी पोलिसांनी कुठलेही कारण न देता रितूला अटक केली. याबाबत रितूच्या पतीने पोलीस उपायुक्त यांना ईमेलच्या माध्यमातून तक्रार देखील केली होती.

अपघात झाल्यापासून रितू प्रत्येकवेळी तपासासाठी हजर राहिलेली आहे, मात्र तपास अधिकारी तिच्या उपस्थितीची नोंद करत नव्हते. ती कधीही फरार झाली नाही, असा दावाही यावेळी रितूने केला. आरोपी रितू मालूच्यावतीने ॲड.चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली. राज्य शासनाच्यावतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी युक्तिवाद केला.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांना काय करावे हे कळत नाही

प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्णय योग्य आहे. पोलीस विविध गोष्टी एकत्र करून गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत. कुठल्याही फौजदारी कायद्यामध्ये नव्याने अर्ज करण्याची तरतुद नाही, मात्र या प्रकरणात पोलीस वारंवार नवे अर्ज करत आहेत. पोलिसांना काय करावे आणि कसे करावे, हे कळत नाही आहे. प्रत्येक वेळी ते वेगळी भूमिका घेत आहेत आणि कायदेशीर प्रक्रियेला डावलत आहेत, असा आरोप रितूने न्यायालयात केला. उल्लेखनीय आहे की फेब्रुवारीमध्ये झालेल्या अपघातानंतर रितूला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी रितू मालूचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.